बिहारमध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांना धक्का

हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली/18 ऑक्टोबर – बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने घोषणा केली असून 6 आणि 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे, तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडी, एनडीए आणि प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष हे महत्त्वाचे मानले जात आहेत. एनडीएसाठी जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे, मात्र महाआघाडीमधील तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे की झारखंडमध्ये सरकारचं नेतृत्व करणार्‍या झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने सहा जागा लढवण्याची घोषणा केली आहे. हेमंत सोरेन यांचा हा निर्णय राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाला महाआघाडीत अपेक्षित 12 जागा न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की ते इंडिया आघाडीबरोबर निवडणूक लढणार नाहीत आणि स्वबळावरच निवडणूक लढवत आहेत. बिहारमधील चकाई, धमदाहा, कटोरिया, पिरपैंती, मनिहारी आणि जमुई या विधानसभा मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार मैदानात उतरवले जातील. पक्षाच्या नेत्यांनी म्हटले की त्यांनी तेजस्वी यादव यांना निवडणूक लढवण्याची जागा सांगितली होती, मात्र तरीही तेजस्वी यादव किंवा राहुल गांधी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाने आता सहा जागा लढवण्याची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button