शहराचा पाणी पुरवठा सुरुच राहणार
मजीप्राकडून कंत्राटदारांना थकीत बिलावर सकारात्मक चर्चा

* एक वर्षापासून थकीत होते बिल
अमरावती17 ऑक्टोंबर – बडनेरा शहरातील सुमारे आठ लाख लोकसंख्या 17 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या तोंडावर पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याच्या धोक्यातून सुटली आहे. कामबंद आंदोलनाची धमकी देणाऱ्या पाणीपुरवठा देखभाल कंत्राटदारांशी तीन तास चाललेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (म.जी.प्रा.) त्यांच्या प्रलंबित बिलांची रक्कम देण्यास सहमती दर्शविली. परिणामी, आंदोलनाची घोषणा करणाऱ्या कंत्राटदारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
कंत्राटदारांचा आरोप होता की त्यांच्या बिलांचे पैसे गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देय रक्कम मिळावी म्हणून म.जी.प्रा. अधिकार्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांना थकीत रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
कंत्राटदारांच्या प्रतिनिधींमध्ये धनंजय बंड, मंगेश बडनखे, नितीन काळे, अनिल भाटकर आणि इतरांचा समावेश होता. त्यांनी अधिकारी आणि अभियंत्यांशी झालेल्या चर्चेत भाग घेतला. या चर्चेदरम्यान अमरावती विभागातील वरिष्ठांनी मुंबई येथील अधिकार्यांशी झालेल्या व्हिडिओ कॉलची माहिती कंत्राटदारांना दिली आणि अखेर तोडगा निघाला.
* दर्यापूर, चिखलदराही प्रभावित
कंत्राटदारांच्या आंदोलनामुळे अमरावती, बडनेरा , दर्यापूर, चिखलदरा आणि अंजनगावसह 340 गावांना पाणीपुरवठा प्रभावित झाला असता. सुमारे 15 लाख लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला असता एव्हढेच नव्हे तर आंदोलन सुरु राहीले असते तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. दरम्यान, म.जी.प्रा. अधिकार्यांनी त्यांची भूमिका विचारण्यात आली असता त्यांनी सांगितले की कंत्राटदार प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली ज्यामुळे देयकांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले आहे.




