मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले ईव्ही ट्रकचे उद्घाटन
10 हजार ट्रक्सची निर्मिती करण्याचा निर्धार

मुंबई/16 ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चाकणमध्ये ईव्ही ट्रक अर्थात इलेक्ट्रिक ट्रक चालवला. ट्रक चालवल्यानंतरचे दृश्य व्हायरल झाले आहे. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा ट्रक प्रत्यक्ष चालवून पाहिला आणि या संदर्भात त्यांनी माहिती दिली की, या ट्रकची 10 हजार युनिट्स निर्मिती करण्यात येणार आहे. या ट्रकची निर्मिती ब्लू एनर्जी कंपनीने केली असून, भारतातील आधुनिक आणि पहिला इलेक्ट्रिक ट्रक असल्याचा कंपनीचा दावा आहे. ट्रकमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा उपलब्ध असून अत्यंत किफायतशीर किमतीत हा ट्रक उपलब्ध आहे. यामुळे कार्गो वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी होईल तसेच परकीय चलनही वाचेल. हा ट्रक पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा असून भारताच्या सर्व वातावरणात चालवता येईल. ट्रकची बॅटरी चार्ज आणि रिप्लेस करता येऊ शकते; साडेचार मिनिटांत बॅटरी बदलता येईल. पहिल्या टप्प्यात मुंबई ते पुणे दरम्यान कॉरिडॉर तयार केला जाणार आहे, जिथे बॅटरी बदलणे तसेच चार्ज करणे शक्य होईल. ही प्रक्रिया पेट्रोल किंवा डिझेल भरायला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळ घेईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सुरुवातीला 10 हजार ट्रक तयार करण्याचे उद्दिष्ट असून, भविष्यात 30 हजार ट्रक निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यांनी दावोस येथे केलेल्या एमओयूची प्रत्यक्ष अंमलबजावणी येथे केली गेली असल्याचेही स्पष्ट केले. ट्रकच्या क्षेत्रात ब्लू एनर्जी आणि एस. आर. यांनी क्रांती घडवली असल्याचे सांगत त्यांनी दोन्हीं कंपन्यांचे अभिनंदन केले.




