महाराष्ट्रसह चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

* वर्धा – भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन
नवी दिल्ली/7 ऑक्टोबर – केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी चार महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अॅनिशनी वैष्णव यांनी सांगितले की, मंजूर प्रकल्पांमध्ये वर्धा-भुसावळ तिसरा व चौथा मार्ग, गोंदिया-डोंगरगड चौथा मार्ग, वडोदरा-रतलाम तिसरा व चौथा मार्ग आणि इटारसी-भोपाळ-बीना चौथा मार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे 24,634 कोटी रुपये असून हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यांमधील 18 जिल्ह्यांना जोडतील आणि भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये अंदाजे 894 किलोमीटरची भर घालतील.
मंजूर प्रकल्पांमध्ये वर्धा-भुसावळ तिसरा व चौथा मार्ग 314 किमी (महाराष्ट्र), गोंदिया-डोंगरगड चौथा मार्ग 84 किमी (महाराष्ट्र आणि छत्तीसगड), वडोदरा-रतलाम तिसरा व चौथा मार्ग 259 किमी (गुजरात आणि मध्य प्रदेश), तसेच इटारसी-भोपाळ-बीना चौथा मार्ग 237 किमी (मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे अंदाजे 8.584 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या सुमारे 3,633 गावांशी संपर्क सुधारेल. तसेच विदिशा (मध्य प्रदेश) आणि राजनांदगाव (छत्तीसगड) यांसारखे महत्त्वाचे जिल्हेही या प्रकल्पांमुळे अधिक चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळवतील.
मल्टी-ट्रॅकिंगमुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची क्षमता वाढेल, रेल्वेचा वेग सुधारेल आणि विलंब कमी होईल. याशिवाय, या प्रकल्पांमुळे आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल आणि या भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.




