ढोल-ताशांचा निनाद व गुलालाची उधळण करीत उत्साहात
‘जय माता दी’ च्या गजरात दुर्गा मातेला संत्रानगरीत निरोप

वरुड । 5 ऑक्टोबर – ‘जय माता दी’ च्या जयजयकारात, ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगीबेरंगी गुलालाच्या उधळणीत वरुडकरांनी दुर्गा मातेला मिरवणुकीच्या माध्यमातून निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी केली. यावर्षीच्या शोभायात्रेत मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ढोल-ताशे आणि बॅन्जो पथक आकर्षण ठरले. नागरिकांनी अत्यंत शांततेत दुर्गा विसर्जन मिरवणूक पार पाडल्याबद्दल वरुड पोलिस व महसूल प्रशासनाने सर्व मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले. सकाळपासूनच शहरातील 45 दुर्गा उत्सव मंडळांचे कार्यकर्ते विसर्जनात व्यस्त होते. शहराच्या मुख्य मार्गाने जंगी मिरवणूक काढण्यात आली, ज्यात ढोल-ताशे, बॅन्जो पथक आणि नाचण्यात तल्लीन कार्यकर्ते यांचे विशेष आकर्षण होते. काही मंडळांनी आकर्षक रथांवर देवीची मूर्ती बसवून नागरिकांचे लक्ष वेधले. विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड जनसागर उसळला होता. मिरवणूक महात्मा फुले चौकापर्यंत नेण्यात आली आणि पुढील दिवशी शेकदरीसह इतर प्रकल्पांवर देवीचे विसर्जन होणार आहे. विशेष म्हणजे आनंद सांस्कृतिक दुर्गा मंडळाने कोणताही जल्लोष न करता देवीला थेट शेकदरी धरणावर नेऊन विसर्जन केले आणि उरलेला निधी एका रुग्णाला मदत म्हणून दिला. त्यामुळे यावेळी जामा मस्जिदसमोरून केवळ पाच दुर्गा मंडळे विसर्जनासाठी गेली. प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता आणि नमाज पठणानंतर मिरवणुका शांततेत मार्गक्रमण केल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. यावर्षी शहरातील विविध ठिकाणचे ढोल-ताशे आणि बॅन्जो पथक शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. तहसीलदार रविंद्र चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर, ठाणेदार अर्जुन ठोसरे आदी अधिकारी तसेच हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसरीकडे शहरातील विविध चौकांमधून निघालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री दहाच्या सुमारास शांततेत पार पडल्या. शेवटी प्रशासनाच्या वतीने सर्व मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले.




