परतवाड्यात लॉरेन्स बिष्णोई टोळी सक्रीय?; 13 संशयितांना घेतले ताब्यात
मुंबई, नागपूर, अमरावती गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

* सर्व आरोपीं हरियातील असल्याचा संशय
* पोलिसांचा हवेत गोळीबार,परीसरात खळबळ, उलटसुलट चर्चांना उधाण
अचलपूर/3 ऑक्टोबर – दसर्यांच्या दिवशी परतवाडा शहरातील ब्राह्मणसभा कॉलनी व खापर्डे प्लॉट भागात मुंबई, नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने दोन घरांवर धाड टाकून 13 युवकांना ताब्यात घेतले. मुंबई क्राईम ब्रांच त्यांची सखोल चौकशी करत असून या युवकांचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेने लॉरेन्स बिष्णोई टोळीतील एका संशयिताचा फोटो अमरावती व नागपूर गुन्हे शाखेला पाठवला होता. तो परतवाडा येथे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री सुमारे 10.30 वाजता ब्राह्मणसभा कॉलनीतील एका घरावर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून प्रतिसाद न मिळाल्याने अधिकाऱ्याने हवेत वार्निंग फायर करून आत असलेल्यांना दार उघडण्यास सांगितले. तरीदेखील दार न उघडल्याने पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने दार उघडून 8 संशयितांना ताब्यात घेतले. मात्र हवा असलेला संशयित तेथे न आढळल्याने खापर्डे प्लॉट भागातील दुसऱ्या घरावर धाड टाकण्यात आली व तेथून आणखी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण 13 जणांना पोलिसांनी परतवाडा ठाण्यात आणून चौकशी सुरू केली. हा प्रकार दसर्याच्या दिवशी घडल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली व शहरात अफवांचा बाजार रंगला. मात्र दुसरीकडे कोणत्याही ठिकाणी गोळीबार किंवा इतर प्रकार झालेला नसल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. मुंबई क्राईम ब्रांच एका आरोपीच्या शोधात असताना तेराही संशयित आढळल्याने परतवाडा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संयुक्त कारवाईत मुंबई, नागपूर व अमरावती गुन्हे शाखेने सहभाग घेतला असून सर्व संशयित हरियाणातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.




