महाराष्ट्रात ई-बॉण्ड प्रणाली सुरू
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

* मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
मुंबई/3 ऑक्टोबर – महाराष्ट्र सरकारने आज (3 ऑक्टोबर) एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्यात ई-बॉण्ड (इलेक्ट्रॉनिक बॉण्ड) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने घेतला असून याबाबतची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकारच्या या निर्णयामुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंदणी आणि मुद्रांक विभाग ई-बॉण्ड प्रणाली सुरु करत आहे. या माध्यमातून स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची गरज नसून थेट ई-बॉण्डवर व्यवहार करता येणार आहेत.
राज्यातील हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही प्रणाली लागू केली असून त्यामुळे व्यवहाराच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात गती आणि पारदर्शकता येणार आहे. मुद्रांक विभागाने आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात केली असून याचा फायदा आयातदार व निर्यातदारांना होणार आहे. या निर्णयानंतर व्यवहार करताना कागदी बॉण्ड देण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय या इलेक्ट्रॉनिक बॉण्डची ऑनलाईन पडताळणी कस्टम अधिकारी करतील. त्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक होणार असून प्रक्रिया सोपी होईल आणि कागदपत्रांसाठी जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.




