गॅगरेपच्या आरोपींची ओळख लपविली

पाचही आरोपींना न्यायालयात केले सादर, भानखेडा शिवारात तरुणीवर अत्याचार

* पिडितांना बेदम मारहाण करून लुटले

अमरावती / 30 मार्चगेल्या शनिवारी रात्री चांदूर रेल्वे मार्गावरील भानखेडा फाट्याजवळ दुचाकी वरून जाणार्‍या तरुण-तरुणीला अडवून, त्यांचे अपहरण करून जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेतील पाचही नराधमांना आज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फ्रेजरपुरा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गुप्तता पाळत आणि कडक पोलीस बंदोबस्तात या पाचही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले.
या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, संतप्त जमावाचा धोका लक्षात घेता न्यायालय परिसरात पोलिसांनी छावणीचे स्वरूप धारण केले होते. या नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर सोबतीला असलेल्या तरुणालाही झाडाला बांधून बेदम मारहाण करत त्यांच्याकडील ऐवज लुटला होता.शनिवारी रात्री संबंधित तरुण आणि तरुणी दुचाकीने जात असताना दबा धरून बसलेल्या या टोळीने त्यांना भानखेडा शिवारात गाठले. निर्जन स्थळाचा फायदा घेत आरोपींनी त्यांना धमकावून जंगलात ओढत नेले. तिथे तरुणाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आणि तरुणीवर आळीपाळीने अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या. आज न्यायालयात हजर करताना आरोपींचे चेहरे पूर्णपणे झाकलेले होते, त्यामुळे प्रसारमाध्यमांना त्यांची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू असून, नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.

तपास पथकाची गुप्त मोहीम

भानखेडा सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. आरोपी स्थानिक परिसरातीलच असल्याची कुणकुण लागताच, पोलिसांनी सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या. संतापलेल्या नागरिकांचा रोष पाहता, पोलिसांनी आरोपींची नावे आणि चेहरे अत्यंत गुप्त ठेवले असून न्यायालयीन कोठडीत त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button