स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार
प्रफुल्ल पटेल यांचे संकेत

मुंबई/29 सप्टेंबर – राज्यात जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका जानेवारीच्या शेवटी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत लढणार का, यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, नगर परिषदेच्या निवडणुका या स्थानिक स्तरावरच्या निवडणुका असतात. या निवडणुका लढण्यासाठी कार्यकर्ते इच्छूक असतात. मोठ्या निवडणुकीमध्ये महायुती शक्य आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या इच्छेचा विचार करता या छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुका स्वतंत्र लढलेल्याच बर्या. यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देता येतो. त्यांना न्याय मिळेल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढल्या पाहिजे. प्रत्येक पक्षाला मोठे होण्याचा अधिकार आहे. याआधी आपण महाविकास आघाडीत होतो तेव्हाही अशा निवडणुका स्वतंत्रपणे लढत होतो आणि नंतर गरज असेल तर एकत्र येत होतो. आताही प्रत्येकाला मुभा आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. जिथे शक्य आहे तिथे युती केली जाईल, मात्र जिथे शक्य नाही तिथे स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले होते. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.




