औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या कॉफी टेबल बुकचे अनावरण

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर /28 सप्टेंबर  : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरात इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत आहे, ज्यामुळे दीड लक्ष लोकांना रोजगार मिळणार असून स्थानिकांनाच शंभर टक्के काम दिले जाणार आहे. औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे मत त्यांनी मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करताना व्यक्त केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार, खनिज उत्खनन व वाहतुकीमुळे स्थानिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सर्वाधिक वाटा स्थानिक लोकांनाच मिळावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. चंद्रपूरने खनिज विकास निधीतून रोजगार निर्मिती, आरोग्य, शिक्षण, कौशल्य आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबविले असून हा परिसर इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून विकसित होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून औद्योगिक विकास साधण्यावर भर दिला जात आहे, तसेच वृक्षारोपण मोहिमाही यशस्वीरीत्या राबवली जात आहे. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्राने ग्रीन कव्हर वाढवले असून आता राज्याचे वनक्षेत्र 33 टक्क्यांवर नेण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय, राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसल्याने पूरग्रस्तांसाठी तातडीने 2 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला असून प्रभावित कुटुंबांना तात्काळ 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. जिल्हाधिकारी व प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर पुढचे दोन ते तीन दिवस अलर्ट मोडवर राहून काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button