पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहणार्याला मीच पाडल
अजितदादांची जोरदार फटकेबाजी

पुणे /26 सप्टेंबर : तुम्हाला कळतं का? आधीचा अजित पवार आणि आताचा अजित पवारमध्ये खूप फरक आहे. जसजसं वय वाढतं तसतसं आपल्याला बदलावं लागतं, आता माझ्यामध्ये मॅच्युरिटी आली आहे. त्यामुळे माझ्याकडे येताना अजिबात संकोच करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांशी मन मोकळेपणाने संवाद साधला. ते म्हणाले की, पूर्वी आपण काही चुकीचं केलं तरी त्यावर पांघरूण घालण्यासाठी साहेब (शरद पवार) असायचे. आता मात्र आपल्यालाच पांघरूण घालावं लागतं, असं म्हणत त्यांनी मिश्किलपणे आपल्या राजकीय प्रवासातील बदल सांगितले. पुणे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून भाजपच्या काही पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. यात भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, आणि रोहन सुरवसे यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या भाषणात राजकीय टोलेबाजी करत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवारांशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधांवरही भाष्य केलं, तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांना लक्ष्य करत त्यांच्यावर थेट निशाणा साधला.




