पोल्ट्रीफार्मच्या मालकाने शेकडो मृत कोंबड्या फेकल्या तलावात
डिगरगव्हाण तलावातील घटना

* नागरिकांत संताप, माहुली जहागीर पोलिसांत गुन्हा दाखल
नांदगाव पेठ/24 सटेंबर : नजीकच्या डिगरगव्हाण येथील एका पोल्ट्रीफार्म संचालकाने फार्ममधील मृत झालेल्या शेकडो कोंबड्या गावातील तलावात फेकून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कुजलेल्या कोबड्यांच्या प्रचंड दुर्गंधीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून, डिगरगव्हाण येथील कर्तव्यदक्ष सरपंचा जिलेेशरी शंकरराव ठाकरे यांच्या तक्रारीनंतर माहुली जहागीर पोलिसांनी त्या पोल्ट्रीफार्म संचालकावर गुन्हे दाखल केले. या प्रकारामुळे गावकर्यांच्या जीवितासमोर मोठा धोका उभा राहिला असून, परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डिगरगव्हाण येथील सरपंचा जिलेेशरी ठाकरे यांनी माहुली पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी पांडुरंग माणिकराव कडू (वय 58, रा. डिगरगव्हाण) यांचे डिगरगव्हाण येथे पोल्ट्रीफार्म असून, 19 सप्टेंबर रोजी एका अज्ञात रोगामुळे त्यांच्या फार्ममधील शेकडो कोंबड्या अचानक मृत पावल्या. पोल्ट्रीफार्मचे संचालक पांडुरंग कडू यांनी कसलाही विचार न करता 20 सप्टेंबरच्या मध्यरात्री सर्व मृत कोंबड्या थेट गावातील तलावात टाकल्या. या कोंबड्या कुजलेल्या अवस्थेत असल्याने तलावातील पाणी दूषित झाले. या तलावाशेजारील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असल्याने हे दूषित पाणी थेट घराघरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला. प्रचंड दुर्गंधी वाढल्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर तलावात असंख्य मृत कोंबड्या कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या. नागरिकांनी ही बाब सरपंच ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली. सरपंच ठाकरे यांनी तातडीने तलावाची पाहणी करून माहुली जहागीर पोलिसांना घटनास्थळी पाठवले. सरपंच जिलेेशरी ठाकरे यांच्या तक्रारीनुसार माहुली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बिएनएसच्या कलम 279, 280, 272, 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.




