काँग्रेसमुळे ईशान्य भारताचे नुकसान

अवघड विकासकामे सोडून दिली, पंतप्रधानांची टीका

इटानगर /22 सप्टेंबर : अवघड असणारी विकासकामे सोडून देण्याची काँग्रेसची अंगभूत सवय होती, त्यामुळे ईशान्य भारताचे लक्षणीय नुकसान झाले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. अरुणाचल प्रदेशमधील कोट्यवधींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर इटानगर येथील इंदिरा गांधी पार्क येथे आयोजित सभेमध्ये मोदी बोलत होते. यावेळी बोलताना मोदी यांनी ‘जीएसटी’ सुधारणांची प्रशंसा केली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दरकपात केल्यामुळे सणासुदीला जनतेला दुहेरी लाभ होईल असा विचार त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोदी म्हणाले की, दिल्लीमधून ईशान्य भारताचा विकास करता येत नाही हे माहीत आहे. त्यामुळे आपण मंत्री आणि अधिकार्‍यांना वारंवार या भागात पाठवत असतो. आपण स्वतः ईशान्येकडील राज्यांमध्ये 70 पेक्षा जास्त वेळा आलो असल्याचे त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोनच जागा असल्यामुळे काँग्रेसने या राज्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप पंतप्रधानांनी केला. यावेळी काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसची एक अंगभूत सवय अशी आहे की ते अवघड असणार्‍या विकासकामांना कधीही हात लावत नाहीत, ते तसेच सोडून देतात. काँग्रेसच्या या सवयीमुळे अरुणाचल प्रदेश आणि संपूर्ण ईशान्य भारताचे लक्षणीय नुकसान झाले आहे. या डोंगरदर्‍यांच्या आणि जंगलभागामध्ये विकासकाम करणे आव्हानात्मक असल्याने काँग्रेस त्या भागाला मागास जाहीर करत असे आणि नंतर तो विसरून जात असे. आपल्या कार्यकाळात अरुणाचल प्रदेशचा विकास झाला असून राज्य प्रगती करत असल्याचा दावा त्यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button