निवडणुकीत गाफील राहू नका
राज ठाकरेंचा पदाधिकार्यांना महत्वाचा आदेश

* मतं चोरीला जातात
मुंबई/19 सप्टेंबर –राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चांना उधाण आले आहे. या पोर्शभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणुकीत गाफील राहू नका, मतदार आपल्याला मतदान करतात, मात्र ही मतं चोरीला जातात. त्यामुळे मतदार याद्यांचा अभ्यास करा, प्रत्येक यादीवर 2 बीएलओ नेमा आणि गटअध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या, असे आदेश दिले. यावेळी अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणीही राज ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पोर्शभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी पदाधिकार्यांशी संवाद साधताना मतदार याद्यांवर अभ्यास करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळावा घेत पदाधिकार्यांशी संवाद साधला. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. मनसेतून नुकत्याच शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबतही राज ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. मात्र अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणी त्यांनी यावेळी जाहीर केली. या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली असून शहर संघटक, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष अशा अनेक नियुक्त्या या नव्या कार्यकारणीत करण्यात आल्या आहेत. तर वादात सापडलेल्या काही जुन्या चेहर्यांना मात्र नव्या कार्यकारणीतून हटवण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या या अंबरनाथ दौर्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून निवडणुकीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




