अंजनगाव बारी परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस

-रेल्वे मार्ग, रस्ते जलमय, पिकांचे नुकसान
अंजनगाव बारी / 17 सप्टेंबर  : अंजनगाव बारी आणि परिसरात मंगळवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला. पार्डी ते उतखेड़ रेल्वे पुलाच्या परिसरात आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्यात एक गाय वाहून गेली. तर पार्डी येथील भुयारी अंडरपास पाण्याखाली जाऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. भिवापूर व कोंडेश्वर तलाव तुडुंब भरले असून सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने जनजीवन विस्कळित झाले.
पार्डी येथील रेल्वे अंडरपासमध्ये पाणी साचल्याने रेल्वे मार्ग व रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वडगाव जिरे परिसरातील रायघोळ नदीला आलेल्या महापुराने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन वेठीस धरले आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता वाहून गेला. वडगाव जिरे-मालखेड रेल्वे रस्ता पुराच्या पाण्यात गेला असून दोन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावकर्‍यांनी सांगितले की, ढगफुटीमुळे झालेला पूर प्रचंड बाधक ठरला आहे. ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्तांची तातडीने पाहणी करून मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली आहे.
पार्डी गावचे सरपंच घनश्याम ब्राम्हणे, उपसरपंच गोलू मडके, माजी सरपंच मनोहर मारोडकर यांच्यासह प्रवीण अरक, दिपक लाहाबर, किसन मात्रे, किसन जेवडे, किसन लाहाबर, सारंगधर वानखडे, प्रकाश लाहाबर, विलास जेवडे, विजय वासनिक, अनामत वासनिक, अमोल लाहाबर, अमोल रामटेके, पंकज ब्राम्हणे, मारोती मात्रे, मारोती अरक, संतोष टोम्पे, गजानन घोडे, प्रभाकर खोब्रागडे, प्रकाश वासनिक, गणेश मारोडकर, नंदू लाहाबर, दिनेश मात्रे, प्रभाकर अरक, जर्नाधन लाहाबर आदी राजकिय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गावोगाव जावून परिस्थीतीची पाहणी केली.
-पिकांचे नुकसान व शेतकरी हवालदिल
महापुराचे पाणी शेतांमध्ये घुसल्याने सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतकर्‍यांना ये-जा करणेही अशक्य झाले. संपूर्ण भागात वाहतूक ठप्प असून नागरिकांनी प्रशासनाला तातडीने मदतीची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button