सव्वा लाख लाडक्या बहिणींना फटका; नावावर कात्री

कर्जाच्या डोंगराखाली महायुती सरकार!

-योजनेतील कपातीमुळे महिलांमध्ये संताप
-लोकानुनयी घोषणांमुळे आर्थिक शिस्त कोलमडली
मुंबई / 16 सप्टेंबर : महायुती सरकारने मोठ्या दिमाखात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत मराठवाड्यातील तब्बल 1 लाख 25 हजार महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या निर्णयामुळे महिला लाभार्थींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. निवडणूक काळात गोड आश्वासने देणार्‍या महायुती सरकारने आता खर्चाच्या भाराखाली दबून लोकप्रिय योजनेलाच कात्री लावल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
महायुतीने सत्ता मिळवण्यासाठी महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचे आमिष दाखवले. मात्र प्रत्यक्षात राज्याची तिजोरी रिकामी होताच त्याच बहिणींना योजनाबाहेर काढले जात असल्याने ही महिलांची थेट फसवणूक आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उबाठा गट) यांनी केला आहे. सरकारने आर्थिक शिस्त बुडवून लोकप्रियतेच्या मोहात घेतलेले निर्णय आता उलटले आहेत. जून 2025 पर्यंत राज्यावर 8 लाख 39 हजार 275 कोटींचे कर्ज झाले असून, या आर्थिक वर्षाअखेर हा आकडा तब्बल 9 लाख 42 हजार कोटींवर जाणार आहे. एवढेच नव्हे तर केवळ व्याजपोटी 64 हजार 659 कोटी रुपये सरकारला फेडावे लागणार आहेत.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील 1 लाख 33 हजार 335 अर्ज तपासण्यात आले. त्यापैकी 65 वर्षांवरील महिलांची नावे वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे लाडक्या बहिणींना अपेक्षित आधार अचानक काढून घेतला जात असल्याने, ग्रामीण भागात रोष अधिक वाढला आहे. लोकप्रिय योजना, वाढते कर्ज आणि महिलांचा संताप या तिहेरी संकटामुळे महायुती सरकारसमोर राजकीयदृष्ट्या मोठा पेच निर्माण झाला आहे.
-सरकारवर चौफेर हल्ला
विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनतेच्या पैशावर उधळपट्टी करून निवडणुका जिंकायच्या आणि नंतर त्याच जनतेला कापायचं हा महायुतीचा डाव आहे अशी टीका होत आहे. महिलांना फसवून सत्ता मिळवली, पण आर्थिक कुवत नसल्याने त्यांच्याच नावावर कात्री लावावी लागत आहे, हे महायुतीचे अपयश असल्याचे विरोधक ठणकावून सांगत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button