काँग्रेसकडून दहशतवाद्यांची पाठराखण?
पीएम नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

-‘ऑपरेशन सिंदूर’चे उदाहरण पुढे
आसाम / 14 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या दरंग जिल्ह्यातील मंगळदोई येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष हा दहशतवादी व घुसखोर शक्तींना पाठिंबा देणारा आहे, असा गंभीर आरोप करत मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
मोदी म्हणाले की, भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळ ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान उद्ध्वस्त केले होते. मात्र त्या काळात देशाच्या सुरक्षादलांना पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेसने घुसखोर व राष्ट्रविरोधी शक्तींना वाचवण्याचे काम केले. “हे यश माँ कामाख्येच्या आशीर्वादानेच शक्य झाले,” असेही पंतप्रधानांनी नमूद केले. काँग्रेसच्या भूमिकेवरून मोदींनी आसामच्या सुपुत्र भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या संदर्भातही कडाडून टीका केली. 1962 च्या चीन आक्रमणावेळी पंडित नेहरूंनी आसामच्या जनतेला दिलेल्या जखमा आजही ताज्याच आहेत. त्यातच काँग्रेसकडून भूपेन हजारिकांचा झालेला अपमान म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे, असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दाखवलेल्या एका व्हिडिओचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “काँग्रेसचे माजी अध्यक्ष हे ‘भाजप गायक-नर्तकांचा सन्मान करत आहे’ असे बोलताना दिसत होते. हा व्हिडिओ 2019 मध्ये भूपेन हजारिका यांना भारतरत्न दिल्यानंतरचा आहे. हे आसामवासीयांचा अपमानच आहे.” पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, “घुसखोरांना जमीन बळकावू देणार नाही. सीमावर्ती भागात घुसखोरीद्वारे लोकसंख्या बदलण्याचा कट रचला जात आहे. हा देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका आहे.” या कटाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी ‘डेमोग्राफी मिशन’ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणाही त्यांनी सभेत केली. या भाषणातून मोदींनी काँग्रेसला राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, घुसखोरी व आसामच्या स्वाभिमानाच्या मुद्यांवरून घेरले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा हल्लाबोल काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.




