विश्वास पाटील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर ‘पानिपत’कारांकडे सूत्रे

-99 वे संमेलन सातार्यात
-साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वसंमतीने निर्णय
पुणे / 14 सप्टेंबर : आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होत असून या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व घटक संस्था तसेच संलग्न प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या बैठकीत अध्यक्षपदासाठी सुचवलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर बहुमताने ‘पानिपत’कार पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
यंदाचे संमेलन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. कारण मराठी साहित्य संमेलन लवकरच आपल्या शतकपूर्तीच्या टप्प्यावर पोहोचत आहे. अशा पार्श्वभूमीवर सातार्यासारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरामध्ये संमेलन भरवले जाणे, आणि त्याचे नेतृत्व मराठा साम्राज्याच्या वारशावर आधारित साहित्याला नवी ओळख देणार्या विश्वास पाटील यांच्याकडे जाणे, हा एक लक्षणीय योगायोग मानला जात आहे.
विश्वास पाटील हे मराठी वाचकांमध्ये ऐतिहासिक कादंबर्यांमुळे विशेष लोकप्रिय आहेत. त्यांची ‘पानिपत’ ही कादंबरी मराठा साम्राज्याच्या वारशावर आधारित असून मराठी साहित्यविश्वात एक महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी ठरली आहे. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पाटील यांच्या निवडीमुळे मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेला ऐतिहासिक साहित्याची नवी झेप व नवा सन्मान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आज झालेल्या बैठकीस महामंडळाच्या चारही घटक संस्थांसह संलग्न व समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उपस्थित सदस्यांनी सुचवलेल्या नावांवर चर्चा करून एकमुखीपणे पाटील यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. या निर्णयानंतर साहित्य वर्तुळात आनंद व्यक्त केला जात असून, शतकपूर्तीकडे वाटचाल करणार्या मराठी साहित्य संमेलनाला नवे दिशा-दर्शन त्यांच्या नेतृत्वाखाली लाभेल, असे मत अनेकांनी मांडले.




