उड्डाण पुलावर अपघात, रेल्वे लोको पायलट गंभीर

खड्ड्यांचे साम्राज्य, लोखंडी सळ्या उघड्या

-वाहनचालक त्रस्त, प्रशासनाविरोधात रोष
अमरावती / 14 सप्टेंबर  : शहरातील महत्त्वाच्या अमरावती-बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे उड्डाण पुलाची अवस्था गेल्या काही दिवसांत अत्यंत दयनीय झाली आहे. पुलाच्या रस्त्यावरील ठिकठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडले असून त्यातून उघड झालेल्या लोखंडी सळ्या रोजच्या प्रवासाला जिवघेण्या ठरत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचादेखील वेगाने होणारा प्रवास या खड्ड्यांमुळे अक्षरशः धोकादायक बनला आहे. नागरिक अनेकदा अपघाताच्या उंबरठ्यावरून सुखरूप वाचले असले तरी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गंभीर अपघाताने या प्रश्नाची तीव्रता सर्वांसमोर उघड केली.
रेल्वेचे लोको पायलट एम. के. तोडासे बडनेर्‍याकडून अमरावतीकडे दुचाकीवरून येत असताना पुलावरील एका मोठ्या खड्ड्यात त्यांची गाडी उसळली. त्यात तोडासे यांचे छातीची चार हाडे व खांद्याचे हाड फॅक्चर झाले, डोक्यालादेखील गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ अमरावतीतील डॉ. सावदेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे ते आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेनंतर नागरिकांच्या संतापाला उधाण आले. हा पुल म्हणजे रस्ता नव्हे तर खड्ड्यांचे साम्राज्यच झाले आहे. दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ खड्डे बुजवून प्रश्न सुटणार नाही. हा पुल दिवसेंदिवस जीर्ण होत चालला असून लोखंडी सळ्या उघड झाल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. दरवेळी अपघात होतो, मग आवाज उठतो, आणि तात्पुरता डागडुजीचा उपाय केला जातो. पण कायमस्वरूपी उपाय केव्हा होणार? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने मोठा अपघात घडण्याआधीच पुलाच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण या पुलावरून दररोज हजारो वाहनांचा वावर असतो. एक छोटीशी बेपर्वाई कधी कोणाचा जीव घेईल याची खात्री नाही. त्यामुळे खड्डे व अपघाताचा हा धोकादायक कॉम्बिनेशन तातडीने थांबवून पुलाचे संपूर्ण मजबुतीकरण व नूतनीकरण करणे अत्यावश्यक आहे, असा लोकांचा ठाम पवित्रा दिसत आहे.

-माजी नगरसेविकेच्या हस्तक्षेपाने प्रशासन हलले
अपघातानंतर तातडीने माजी नगरसेविका सौ. मंजुषा जाधव यांनी पुढाकार घेत भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्याशी थेट संपर्क साधला. यापुढे एखादा जीव गेला तर जबाबदार रेल्वे प्रशासन असेल, असा इशाराही त्यांनी दिला. अखेर त्यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासन हलले आणि 13 सप्टेंबर रोजी पुलावरील सर्व खड्ड्यांवर सिमेंट काँक्रीट टाकून बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button