महापालिका प्रारुप प्रभाग रचनेवर 23 आक्षेपांची नोंद

माजी नगरसेवकांसह नागरिकांकडून आपत्ती

-वस्त्यांचा अनूल्लेख, सिमा भंगावर आपत्ती
-वगळलेल्या भागांना पून्हा जोडण्याचा आग्रह
अमरावती / 10 सप्टेंबर : अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनपा प्रशासनाने 3 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर आता आक्षेप व सूचना नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्यास मुदत देण्यात आली असून, आज दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल 23 आक्षेप प्रशासनाकडे आले आहेत. विशेष म्हणजे यात अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गवळीपुरा परिसरातील माजी नगरसेवक शेख हमीद शद्दा यांनी आपला आक्षेप नोंदविला आहे. गवळीपुरा परिसर पूर्वी प्रभाग क्र. 15 (छाया नगर-गवळीपुरा) मध्ये होता. मात्र नव्या रचनेत त्याचा समावेश विलास नगर प्रभागात करण्यात आला आहे. त्यामुळे हा परिसर पुन्हा छाया नगर-गवळीपुरा प्रभागाशी जोडावा, अशी मागणी शेख हमीद शद्दा यांनी केली आहे. दरम्यान, माजी नगरसेवक धीरज हिवसे (प्रभाग क्र. 5 महेंद्र कॉलनी-न्यू कॉटन मार्केट) यांनी प्रारुप रचनेत लिपीकीय चूक झाल्याचे निदर्शनास आणले आहे. परिसीमन ठरविताना गौतम निकालजे यांच्या घराऐवजी प्रथमेश गवई यांच्या घराचा उल्लेख करण्यात आला असून, प्रत्यक्षात गवई यांचे घर प्रभागापासून दूर आहे. त्यामुळे हद्द गौतम निकालजे यांच्या घरापर्यंत असावी, अशी मागणी त्यांनी केली.
माजी नगरसेवक अजय गोंडाणे यांनी प्रभाग क्र. 10 (बेनोडा-भीमटेकडी-दस्तूर नगर) आणि प्रभाग क्र. 11 (रुक्मिणी नगर-फ्रेजरपुरा) यांच्या रचनेबाबत आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, चार गल्लींना एका प्रभागातून कापून दुसर्‍यात जोडण्यात आले असून, त्यामुळे नैसर्गिक सीमा भंग झाली आहे. या गल्लींना पुन्हा मूळ प्रभागात जोडावे, अशी त्यांची मागणी आहे.
तसेच माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बंडू हिवसे यांनी प्रभाग क्र. 12 स्वामी विवेकानंद कॉलनीमध्ये बेलपुरा, किरण नगर क्र. 1 व 2, डहाणे नगर, भगवान नगर, कमल कॉलनी व मोती नगर या वसाहतींचा उल्लेख न झाल्याची तक्रार केली आहे. अंतिम रचनेत या वसाहतींचा समावेश करावा, अशी त्यांनी मागणी केली. माजी नगरसेविका जयश्री देवराव कुर्हेकर यांनीही प्रभाग क्र. 12 मध्ये किरण नगर क्र. 1 व 2, प्रसाद कॉलनी व विदर्भ हाऊसिंग सोसायटीचा संपूर्ण समावेश करावा, असा आग्रह धरला आहे.
याशिवाय भाजप शहर कार्यकारिणी सदस्य तुषार वानखेडे (नमुना गल्ली क्र. 3), पारिजात सहकारी संस्थेचे सचिव सुरेश नांदुरकर (नेमानी गोदाम), घनश्याम डकरे (स्वागतम कॉलनी), प्रथमेश रविकांत गवई (विलास नगर) व विजय नरेंद्र पवार (एमआयडीसी रोड) यांनीही आपले आक्षेप प्रशासनासमोर नोंदविले आहेत. तसेच माजी नगरसेवक प्रमोद पांडे, विजय पवार, रविंद्र जोशी, प्रशांत कवाने, रमेश फटिंग, विकास पांडे, सागर तिवारी, संजय दुपारते, अतुल देशमुख, आशा दरने, आनंद दरने, इकबाल साहिल मोहम्मद फारूक, प्रफुल्ल लोखंडे आणि प्रवीण मनोहर वाकोडे यांनीही आपल्या प्रभागातील रचनेवर आक्षेप नोंदविले आहेत.
-15 सप्टेंबरपर्यंत मुदत
मनपा प्रशासनाकडून 15 सप्टेंबरपर्यंत सर्वसामान्य नागरिकांकडून आक्षेप व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा नियुक्त अधिकारी यांच्या समोर सुनावणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा प्रशासन आपली शिफारस करून अंतिम प्रभाग रचना प्रस्ताव संभागीय आयुक्तामार्फत नगरविकास विभागाकडे पाठवतील. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहीर करून मनपा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करेल.

संबंधित बातम्या

Back to top button