अपघातात दांपत्यासह एक वर्षाच्या बालकाचा करुण अंत

भरधाव स्कॉर्पिओने घेतले तीन जीव

-गंगापूर तालुक्यातील घटना
गंगापूर / 8 सप्टेंबर : गंगापूर तालुक्यातील वरखेड शिवारात नांदूर मध्यमेश्वर कालवा रस्त्यावर सोमवारी (दि. 8 सप्टेंबर) सकाळी 8 वाजता घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ निर्माण केली. भरधाव स्कॉर्पिओने मोटारसायकलला जोरदार धडक दिली, ज्यामुळे तिघे हवेत फेकले गेले व शेतात पडले. या दुर्घटनेत तरुण दांपत्यासह एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला.
सजन राजू राजपूत (28), शितल सजन राजपूत (25) आणि कृष्णांश (1 वर्ष) अशी मृतकांची नावे आहेत. हे कुटुंब वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील रहिवासी असून वाळूज औद्योगिक वसाहतीत वास्तव्यास होते. सुट्ट्यांचा उपयोग करत त्यांनी मूळ गावी सटाणाला भेट दिली होती. परत वाळूजला जाताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली, तेव्हा हृदयद्रावक दृश्य उभे राहिले. 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. विशाल सुर्यवंशी व डॉ. मुजम्मिल शेख यांच्या तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित करण्यात आले.
अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलीस टीम, पोहे कॉ. विनोद बिघोत यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. या अपघाताने फक्त कुटुंबच नव्हे तर परिसरातील लोकांच्या मनावरही धक्का बसला आहे. पाहणार्‍यांच्या डोळ्यांत अश्रू आणि हळहळ स्पष्ट दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button