उपराष्ट्रपती निवडणूक : एनडीएचा विजय जवळपास निश्चित
-बीआरएस आणि बीजेडी मतदानावर बहिष्कार

-सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन उमेदवार
-एनडीए-इंडिया आघाडीची कसोटी
-प्रादेशिक पक्षांवर राहणार लक्ष
नवी दिल्ली/ 8 सप्टेंबर : भारताच्या उपराष्ट्रपती पदाची मंगळवारी (दि. 9 सप्टेंबर) होणारी निवडणूक जरी केवळ औपचारिकता वाटत असली तरी त्यामागील राजकीय पैलू अधिक गहन आहेत. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील बीजू जनता दल (बीजेडी) यांनी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे सोमवारी जाहीर केले. या निर्णयामुळे 9 सप्टेंबर रोजी होणार्या उपराष्ट्रपती निवडणुकीवर थेट परिणाम होणार नाही, तरी राजकीय संदेश स्पष्ट झाला आहे.
बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव म्हणाले, तेलंगणातील युरियाचा तुटवडा आणि शेतकर्यांच्या समस्या लक्षात घेऊन आम्ही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही. भाजप आणि काँग्रेस या पक्षांना या प्रश्नावर उपाय शोधण्यात अपयश आले. त्यांनी सांगितले की, उपराष्ट्रपती निवडणुकीत नोटा पर्याय असेल तर आम्ही तो निवडू. बीजेडीचे नेता सस्मित पात्रा यांनीही स्पष्ट केले की, उपराष्ट्रपती निवडणुकीत आम्ही इंडिया ब्लॉक आणि एनडीएपासून समान अंतर राखून राहू.
सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होईल आणि सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येईल. एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीकडून सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे मैदानात आहेत. उपराष्ट्रपती निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रतिनिधींनी होणार्या निर्वाचक मंडळाद्वारे केली जाते. 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला आणि तेव्हापासून हे पद रिक्त आहे.
या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम पार्टी, तेलंगणातील बीआरएस, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी गट) हे पक्ष क्रॉस व्होटिंग करतात, तर विरोधक त्याचा फायदा घेऊन देशभरात राजकीय संदेश देऊ शकतात. राजकीयदृष्ट्या ही निवडणूक भाजपसाठी आपली ताकद दाखवण्याची संधी आहे, तर विरोधकांसाठी आपली उपस्थिती नोंदवण्याची. एनडीएचा विजय निश्चित असूनही खरा विजय हा विरोधकांनी पराभवातही मिळवलेल्या मते आणि त्याचा राजकीय अर्थ यात आहे. मतांमधील फरक जर अपेक्षेपेक्षा जास्त राहिला, तर विरोधकांच्या ताकदीचा संदेश मिळतो; तर खूपच कमी मते मिळाल्यास विरोधकांची कमकुवत बाजू उघड होते.
-बहुमतासाठी 392 मते पुरेशी
एकूण 782 खासदार या निवडणुकीत मतदान करतील आणि साध्या बहुमतासाठी 392 मते पुरेशा आहेत. लोकसभेत भाजपचे 240 खासदार असून एनडीएच्या इतर सहकारी पक्षांच्या मदतीने हा आकडा सुमारे 426 पर्यंत पोहोचतो. राज्यसभेत भाजपचे सुमारे 102 खासदार असून एनडीएचा आकडा 134 च्या आसपास आहे. त्यामुळे सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे स्पष्ट आहे.
-विरोधकांची रणनीती: पराभवातही संदेश
इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव निश्चित असूनही विरोधकांनी ही लढाई फक्त ‘हार-जीत’पुरती मर्यादित ठेवली नाही. विरोधकांचा हेतू आहे व्होट बँक वाढवणे. उपराष्ट्रपती निवडणुकीत गुप्त मतदान होते आणि पक्षाचा व्हिप लागू होत नाही, त्यामुळे क्रॉस व्होटिंगच्या माध्यमातून विरोधकांना काही आकडे मिळण्याची आशा आहे.



