मराठा आरक्षण : ओबीसींना धक्का बसणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

-पुरावे असलेल्यांनाच लाभ
-समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही
मुंबई / 2 सप्टेंबर : मराठा आरक्षण प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले. त्यांनी ठामपणे सांगितले की मराठा समाजाला दिलासा मिळेल पण ओबीसी समाजाला कुठलाही धक्का बसणार नाही. महाराष्ट्राची सामाजिक वीण टिकवणे हेच सरकारचे सर्वात मोठे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या अथक प्रयत्नांमुळे हा तोडगा शक्य झाला. त्यामुळे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारची तयारी आधीपासूनच होती, मात्र सरसकट आरक्षण कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. संविधानानुसार आरक्षण हे व्यक्तीला मिळते, समूहाला नाही. त्यामुळे योग्य पुरावे असलेल्यांनाच फायदा होणार आहे. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे जुन्या नोंदी शोधणे सोपे होईल आणि ‘फॅमिली ट्री’च्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल. या निर्णयामुळे मराठा समाजातील पात्र लोकांना कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेणे सोपे होईल.
मुंबईत आंदोलनामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी व व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईकरांची माफी मागितली. त्याचबरोबर त्यांनी ओबीसी समाजालाही साखळी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न होणार नाही. ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ दिली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.
या निर्णयाच्या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. याबद्दल त्यांचे विशेष आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, हे सर्व निर्णय एकत्रितपणे समाजहित लक्षात घेऊन घेण्यात आले आहेत. तसेच ‘सारथी’ संस्था, उद्योजकतेसाठी विशेष योजना, तरुणांना उद्योगधंद्यात प्रोत्साहन देणे अशा अनेक उपक्रमांद्वारे मराठा समाजाला मदत करण्यात सरकार सक्रिय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
फडणवीस म्हणाले की, समाजात काम करताना कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार; पण प्रत्येक समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे कर्तव्य आहे. माझे एकमेव ध्येय समाजात तेढ निर्माण न होऊ देणे आणि कायदेशीर व न्याय्य तोडगा काढणे होते. त्यांनी आश्वस्त केले की, सामाजिक तणाव आणि राजकीय दबाव असूनही, मराठा-ओबीसी समाजातील संतुलन राखणे आणि खर्या गरजू नागरिकांना लाभ मिळवून देणे हेच सरकारचे अंतिम उद्दिष्ट राहिले आहे.
-वैयक्तिक टिकेने विचलित झालो नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाच्या काळात त्यांच्या विरोधात वैयक्तिक टीका झाल्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, काही लोकांनी वैयक्तिक स्वरूपात आरोप किंवा टीका केली, काही ठिकाणी त्यांना वैयक्तिक दुश्मनीची भावना दाखवली. परंतु त्यांचे लक्ष समाजहिताच्या तोडग्यावर केंद्रित होते आणि त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक टीकेमुळे विचलित होण्याची त्यांना गरज भासली नाही.




