लोअर व अप्पर वर्धा प्रकल्पाचे तब्बल 38 दरवाजे उघडले

पाण्याचा प्रचंड प्रमाणात विसर्ग

-वर्धा खोर्‍यात धरणसाठा धोक्याच्या टप्प्यावर
-नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
अमरावती / 2 सप्टेंबर : वर्धा-तापी खोर्‍यात मुसळधार पावसामुळे लोअर वर्धा आणि अप्पर वर्धा या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांचे जलसाठे क्षमतेच्या धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दोन्ही धरणांचे तब्बल 38 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धनोडी (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील लोअर वर्धा प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 253.34 दशलक्ष घनमीटर असून त्यातील जिवंत साठा 216.87 दशलक्ष घनमीटर आहे. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पाण्याची पातळी 282.88 मीटर इतकी नोंदली गेली, जी एकूण क्षमतेच्या जवळपास 74 टक्के होती. सध्या धरणाचे पंचवीस दरवाजे प्रत्येकी तीस सेंटीमीटरने उघडे ठेवण्यात आले असून 666 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सुरू आहे. कालव्यांकडे अद्याप पाणी सोडलेले नाही.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात तब्बल 96 टक्क्यांहून अधिक भर झाल्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजता तेरा दरवाजे प्रत्येकी पंचावन्न सेंटीमीटरने उघडण्यात आले. या धरणाची एकूण साठवण क्षमता 786 दशलक्ष घनमीटर असून जिवंत साठा 614 दशलक्ष घनमीटर आहे. यामधून तब्बल 1151 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात 26.85 दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली असून एकूण विसर्ग 78.85 दशलक्ष घनमीटरवर गेला आहे. धरण क्षेत्रात काल 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हंगामातील पर्जन्यमान 665 मिलीमीटरपर्यंत पोहोचले आहे.
लोअर वर्धा धरणाची एकूण लांबी 9,464 मीटर आणि उंची 27.8 मीटर आहे तर अपर वर्धा धरणाची लांबी 5,920 मीटर व उंची 46 मीटर आहे. या प्रचंड जलाशयांचा विसर्ग थेट वर्धा नदीपात्रावर परिणाम करणारा असल्याने प्रशासनाने गावागावात सतर्कतेचे संदेश देण्यास सुरुवात केली आहे.
-पूरस्थितीची शक्यता व प्रशासनाची तयारी
दोन्ही धरणांमधून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने महसूल, पोलीस, जलसंपदा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली असून नागरिकांनी नदीपात्रात जाणे, मासेमारी अथवा धोकादायक ठिकाणी वावरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button