चिखलदर्‍यातील महिला शक्तीचा एल्गार; बीजभांडवलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतरही नगरपरिषद क्षेत्रातील महिला वंचित

* आ.केवलराम काळेंचा जिल्हा प्रशासनाला जाब

चिखलदरा / 29 मार्च : पालकमंत्र्यांनी घोषित केलेले प्रत्येकी एक लाख रुपयांचे बीजभांडवल चिखलदरा नगरपरिषदेच्या 60 महिला बचत गटांना अद्याप मिळालेले नाही. प्रशासनाच्या या दुजाभावामुळे संतप्त महिलांनी नगराध्यक्ष शेख अब्दुल आणि आमदार केवळराम काळे यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली असून, या लढ्याला आता यश येताना दिसत आहे.
मेळघाटातील चिखलदरा नगरपरिषद क्षेत्रातील आदिवासी व मूळनिवासी महिला बचत गटांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी थेट जिल्हा प्रशासनाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक बचत गटाला एक लाख रुपये बीजभांडवल मिळणे अपेक्षित असताना, केवळ तांत्रिक कारणास्तव नगरपरिषद क्षेत्रातील गट या लाभापासून वंचित राहिले आहेत. या अन्यायाविरुद्ध संतप्त झालेल्या महिलांच्या शिष्टमंडळाने 17 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ’माविम’च्या 407 गटांना 6 कोटी 26 लाख 15 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, चिखलदरा नगरपरिषद हद्दीतील ’राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (छणङच्) अंतर्गत कार्यरत असलेले 60 महिला बचत गट यातून सुटले आहेत. चिखलदरा हा डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी बहुल भाग असल्याने येथील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा निधी संजीवनी ठरणार आहे. याच हेतूने 9 फेब्रुवारी 2026 रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या गटांना लाभ देण्याबाबतचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर व मुख्याधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवला होता. या प्रश्नी आमदार केवळराम काळे यांनीही 12 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून पालकमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. प्रशासकीय पातळीवर या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने महिलांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे. सर्व गटांना समान वागणूक देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते, तसेच महिला स्वतःचा 10 टक्के वाटा भरण्यास तयार असतानाही निधी का रोखला? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संघर्षात नगराध्यक्ष अब्दुल भाई यांनी मोठी भूमिका बजावत महिलांना संघटित केले आहे.

नगराध्यक्ष अब्दुल भाईंच्या पुढाकाराने सुटला पेच

चिखलदर्‍यातील महिलांच्या या लढ्याचे नेतृत्व करत नगराध्यक्ष शेख अब्दुल यांनी पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी नगरपरिषदेच्या प्रस्तावाची प्रत सादर करत आश्वासनाची आठवण करून दिली. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेत जिल्हा नियोजन समितीला हे आदेश पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button