मेळघाटातील बारू गावात तलाव फुटला
शेती उद्ध्वस्त, वाहतूक ठप्प

धारणी : मेळघाटातील बारू गावात सोमवारी सकाळी धारणी-अकोट रस्त्यालगतचा तलाव अचानक फुटला. पाणी थेट शेतात शिरून शेकडो हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, मका या खरीप पिकांचे नुकसान झाले. जोरदार प्रवाहामुळे काही ठिकाणी जमीनच खरडून गेली. ग्रामस्थांनी या तलावाची अवस्था धोकादायक असल्याचे यापूर्वीच प्रशासनाला सांगितले होते. मात्र दुरुस्ती न झाल्याने अखेर मोठी दुर्घटना घडली.
तलाव फुटल्याने केवळ शेतीच नाही तर वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. धारणी-अकोट मार्गावर पाणी आल्याने वाहनांची वर्दळ थांबली. शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर बारु गावात पोहोचून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. भविष्यात संकट टाळण्यासाठी मेळघाटातील क्षतीग्रस्त तलावांच्या दुरुस्तीची मागणी पटेल यांनी केली आहे.
-प्रशासनाची कसोटी
पूरस्थितीमुळे जिल्हाभरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, पूल वाहून गेले असून शाळा बंद राहिल्या आहेत. पिण्याचे पाणी, वीजपुरवठा व वाहतूक यांचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोर्शीतील संत्रा बागा असो वा बारू गावातील तलाव फुटी – प्रत्येक घटनेने शेतकर्यांचे नुकसान प्रचंड झाले आहे. गावोगाव पंचनामे करून तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. ही परिस्थिती महसूल व प्रशासनासाठी मोठी कसोटी मानली जात आहे.




