अमरावतीत महाजनपूर येथील 2 हेक्टर जमिनीवर उभारणार गरिबांसाठी घरकुले
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई /21एप्रिल-अमरावतीतील बेघरांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्यातील मौजा महाजनपूर येथील 2.00 हेक्टर आर (सुमारे 5 एकर) जमीन गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाला (म्हाडा) प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे.
महसूल व वन विभागाने आज निर्गमित केलेल्या आदेशानुसार, मौजा महाजनपूर (ता. जि. अमरावती) येथील शेत सर्व्हे नं. 20/1 मधील जागा ’प्रधानमंत्री आवास योजना’ राबवण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही जागा केवळ 1 रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने ’भोगवटादार वर्ग-2’ या धारणाधिकारावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत गृहनिर्माणाचे काम सुरू करणे बंधनकारक राहील. या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रकल्पासाठीच (प्रधानमंत्री आवास योजना) करता येईल. अमरावतीच्या जिल्हाधिकार्यानी संबंधित विभागाकडून जमिनीची मोजणी करून घेणे आणि भविष्यात या जागेवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अटींचा भंग झाल्यास जमीन पुन्हा शासनजमा करण्याचा अधिकार शासनाने राखून ठेवला आहे.
अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि गरिबांना हक्काचा निवारा देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. महाजनपूर येथील ही जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून, ती नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होऊन त्याचा थेट लाभ सामान्य लाभार्थ्यांना मिळेल. या जागेवर गृहनिर्माण प्रकल्पाचे काम येत्या तीन वर्षांत सुरू करणे बंधनकारक करण्यात आले असून, बांधकामाचा दर्जा आणि नियोजनाबाबत स्वतः लक्ष देणार आहोत.
-चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री




