अयान गँगचा मुक्काम आता पोलीस कोठडीतच!

परतवाडा-अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणी

न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत सुनावली कोठडी

सरकारी वकिलांचा न्यायालयात ‘शानदार’ युक्तिवाद

परतवाडा/21एप्रिल- परतवाडा आणि अचलपूर या जुळ्या शहरात खळबळ उडवून देणार्‍या अत्यंत किळसवाण्या लैंगिक शोषण आणि व्हिडीओ कांडमधील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यासह त्याच्या टोळीचा मुक्काम आता 27 एप्रिलपर्यंत कोठडीतच असणार आहे. पोलिसांनी केलेल्या मागणीवर न्यायालयाने मोहोर उमटवत या चौघांच्याही पोलीस कोठडीत मोठी वाढ केली आहे. यामुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुळ्या शहराला काळिमा फासणार्‍या या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद, उजैर खान इकबाल खान, मो. साद मो. साबिर आणि तबरेज खान तसलीम खान या चौघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज स्थानिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य आणि लोकांचा संताप पाहता पोलीस प्रशासनाने न्यायालय परिसराचे छावणीत रूपांतर केले होते. पुरुष आणि महिला कमांडोंसह पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. आरोपींना न्यायालयात आणताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली, ज्यामुळे काही वेळ पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये वादावादीही झाली. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पत्रकारांना आत सोडण्यात आले. सुनावणी दरम्यान सरकारी वकील डी. ए. नवले यांनी न्यायालयासमोर तपासाची कच्ची चिठ्ठीच उघडली. आरोपींनी केलेले कृत्य अत्यंत गंभीर असून, तपासात अनेक नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. या टोळीचे धागेदोरे कुठे कुठे पसरले आहेत, त्यांना नेमकी रसद कुठून मिळते आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये होणारी आर्थिक उलाढाल कोणाची आहे, याचा छडा लावणे अजून बाकी आहे. तसेच पीडित महिलांच्या जबाबातून समोर आलेल्या इतर संशयितांची ओळख पटवणे आणि त्यांना बेड्या ठोकणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. सरकारी वकील विचारे यांनीही या युक्तीवादाला जोरदार पाठिंबा दिला.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के यांनी न्यायालयाला सांगितले की, या गुन्ह्यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून आरोपींचे ’फंडिंग’ आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. बचाव पक्षाचे वकील वकार अहमद यांनी कोठडीला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारी पक्षाचा पुरावा आणि तपासाची व्याप्ती पाहता न्यायाधीश सागर पाटिल यांनी आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत (पीसीआर) ठेवण्याचे आदेश दिले. सायंकाळी साडेपाच वाजता आरोपींना पुन्हा कड्या सुरक्षेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आता पोलीस कोठडीत अयान आणि त्याची टोळी नेमकी काय गुपिते ओकते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पांढरपेशा गुन्हेगारांचे धाबे दणाणले

या प्रकरणातील तपासाची चक्रे आता वेगाने फिरू लागली असून आरोपींचे बँक व्यवहार आणि ’फंडिंग’ पोलिसांच्या रडारवर आले आहे. शहरात वावरणारे आणखी काही पांढरपेशा गुन्हेगार या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार केला असून, लवकरच या गुन्ह्यातील इतर पडद्यामागचे सूत्रधारही जेरबंद होतील, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button