प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्त्या

शेंदुरजनाघाट पोलिसांनी उघड केला खुनाचा थरार

शेंदुरजनाघाट/21एप्रिल– एका रस्ते अपघाताच्या गुन्ह्याला वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या (साळभाऊ) मदतीने काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी पोलीस स्टेशन शेंदुरजनाघाट येथे किशोर प्रेमलाल युवनाते (34, रा.खडकी, जि.बैतूल) यांच्या मृत्यूबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, किशोर यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. तपासादरम्यान किशोर यांची पत्नी शिवकला (21) आणि त्याचा साळभाऊ मखन मनदेव धुर्वे (32, रा.मेट, जि.पांढुर्णा) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सत्य समोर आले. शिवकला आणि मखन यांचे जुने प्रेमसंबंध होते, ज्यावर किशोर संशय घेत होता. याच रागातून दोघांनी किशोर यांच्या हत्येचा कट रचला. 2 एप्रिल 2026 रोजी किशोर सासरी गव्हारगोंदी येथे एका अंत्यसंस्कारासाठी गेला होता. तिथून परत येत असताना, करवार नाका ते पिपलागड रोडवरील घोगरा नाल्याच्या पुलाखाली मखन याने किशोरवर दगडाने हल्ला करुन त्याला ठार केले. हत्येनंतर हा प्रकार अपघात वाटावा असा बनाव रचण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. तांत्रिक तपासाअंती हा अपघात नसून खून असल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 238, 61 (2), 3(5) यांचा समावेश केला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे, स.पो.नि.दीपक महाडीक, उपनिरीक्षक मंगेश शेगोकार, पोहेकॉ.संदीप वानखडे, विष्णु पवार, पो.कॉ. सागर लेव्हरकर, उमेश कुंभेकर, महीला पो.कॉ.प्रियंका कुमरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button