नांदगाव तालुक्यात महिला शेतकर्‍याची आत्महत्या

वेणी गणेशपुर येथील घटना

-नापिकी, कर्जापायी टोकाचे पाउल
अमरावती / 2 सप्टेंबर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपुर गावात धक्कादायक घटना घडली आहे. महिला शेतकरी ज्योत्स्ना भोयर (वय 38) यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने केवळ गावच नव्हे तर संपूर्ण परिसर स्तब्ध झाला असून, महिला शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण हा गंभीर प्रश्न बनत चालल्याची जाणीव अधिक तीव्रतेने समाजासमोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून शेतात सतत नापिकी होत होती. शेतीतून मिळणार्‍या मालाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नव्हता. सरकारी हमीभाव केवळ कागदोपत्री राहिल्याने ज्योत्स्ना भोयर यांच्या हातात प्रत्यक्ष उत्पन्नाचे साधन उरले नव्हते. याच काळात शासकीय व खासगी बँकांचे मिळून तब्बल 2 लाख 90 हजार रुपये कर्जाचे ओझे त्यांच्या खांद्यावर जमा झाले. त्यातच पतीचे निधन झाल्याने संसाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या अंगावर आली होती. शुभम आणि गौरव अशी दोन मुले असून त्यांचे शिक्षण, संगोपन व कुटुंबाची रोजची धावपळ या सर्वांमुळे त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या.
शेवटी या विवंचनांना कंटाळून ज्योत्स्ना भोयर यांनी आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने सरकारकडे कठोर शब्दांत मागणी केली आहे. शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा, शेतकर्‍यांचे कर्ज तातडीने माफ करावे आणि विशेषत: महिला शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र सहाय्य योजना राबविण्यात यावी, अन्यथा ग्रामीण समाजाचे जगणे अधिकच कठीण होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button