आयुक्त सौम्या शर्मा यांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी
गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

-प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे सर्व सुविधा
-शहरात एकूण 23 कृत्रिम तलावांची व्यवस्था
-स्वच्छता, सुरक्षेसह आपत्कालीन सेवांची काटेकोर तयारी
अमरावती / 2 सप्टेंबर : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव या प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी करून सर्व सोयीसुविधांची तपासणी केली. आगामी गणेशोत्सवात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पर्यावरणपूरक विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, महापालिका श्री गणपती विसर्जनासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी स्वच्छता व्यवस्था, रोषणाई, सुरक्षा उपाय, वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा आणि कृत्रिम तलावांची रचना यांचा बारकाईने आढावा घेतला. संबंधित अधिकार्यांना तातडीने आवश्यक त्या सूचना देत त्यांनी तलाव परिसरात कचरा साचू नये म्हणून विशेष पथके तैनात करण्याचे आदेश दिले. विसर्जन स्थळी मंडप, बॅराकेटींग, स्टेज, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, जनरेटर, पोलीस, होमगार्ड तसेच महापालिकेचे स्वयंसेवक यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने विसर्जनकाळात मदत केंद्र, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा, स्वच्छता पथके आणि अग्निशमन यंत्रणा सतत सज्ज राहणार आहेत. गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षा यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच, विविध माध्यमांतून जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या, गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव आहे. हा उत्सव आपण सर्वांनी पर्यावरणाचे भान ठेवून साजरा करणे आवश्यक आहे. विसर्जनावेळी कृपया नैसर्गिक जलस्रोतांची हानी होणार नाही, याची दक्षता घ्या. स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, महापालिकेच्या कर्मचार्यांना सहकार्य करा आणि शांतता व सुव्यवस्थेचे पालन करा.
प्रथमेश व छत्री तलाव परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मूर्तींचे विसर्जन होत असल्याने याठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले असून, सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, आनंददायी आणि पर्यावरणपूरक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, अग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे, अभियंता शरद तिनखेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन
शहरात यंदा एकूण 23 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून, नागरिकांनी शक्यतो मूर्तींचे विसर्जन याच तलावांमध्ये करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक विसर्जन हा सर्वांचा सामूहिक संकल्प असावा. त्यासाठी मातीच्या मूर्तींचा वापर करावा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळाव्यात.




