किरीट सोमय्यांमुळे अमरावतीची बदनामी, काँग्रेसचा हल्लाबोल

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचा राजकीय खेळ

-विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांना त्रास
-पोलीस आयुक्तांना काँग्रेस शिष्टमंडळाचे निवेदन
अमरावती / 2 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्याची प्रतिमा मलिन करण्यामागे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सततच्या दौर्‍यांचा थेट हात असून, त्यांच्या जात प्रमाणपत्र बनावट प्रकरणातील राजकीय आरोपांमुळे जिल्ह्यात अनावश्यक तणाव व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. याच कारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांना होणारा छळ आणि प्रशासनावर होणारा दबाव याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदन सादर केले.
काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले की, काही महिन्यांपूर्वी सोमय्यांनी अमरावतीत सातत्याने दौरे करत बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी व रोहिंग्या व्यक्तींना खोट्या जाती प्रमाणपत्रांचे वाटप होत असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर नव्या जाती प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आली होती. या निर्णयामुळे हजारो नागरिकांचे कामकाज ठप्प झाले व मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. काँग्रेसने हा मुद्दा अधोरेखित करत सांगितले की, सोमय्या यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्थ्य नसल्याचे प्रशासकिय चौकशीतून स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण लोकहितापेक्षा राजकीय स्वार्थासाठी उकरून काढले गेले असून जिल्ह्याची प्रतिमा बदनाम करण्यात आली.
शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देताना सांगितले की, सोमय्यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण होणारा गोंधळ सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करतो. विद्यार्थ्यांचे शिक्षण बिघडते, व्यवसायिकांना अडचणी येतात आणि नागरिकांना विनाकारण छळ सहन करावा लागतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता निष्पक्ष कामगिरी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. दरम्यान, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शिष्टमंडळाच्या निवेदनाची नोंद घेतली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलींद चिमोटे, शहराध्यक्ष बबलू शेखावत, युवक काँग्रेस प्रवक्ता इसरार आलम, नजीरभाई, अमीन खान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
-प्रशासनाने दबावाला बळी पडू नये
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमरावतीची ओळख सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रगत शहर अशी आहे. मात्र काही राजकीय नेते स्वार्थासाठी मुद्दाम वादाचे वातावरण निर्माण करून जिल्ह्याची प्रतिमा मलिन करतात. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन, कुठल्याही दबावाखाली न येता ठाम व निष्पक्ष भूमिका घ्यावी.

संबंधित बातम्या

Back to top button