तब्बल साडेतीन तास पृथ्वीच्या सावलीत राहणार चंद्र

7 सप्टेंबरला चंद्रग्रहणाचा अद्भुत सोहळा!

-खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी
अमरावती / 1 सप्टेंबर : निसर्गातील अद्भुत सावल्यांचा खेळ पाहण्याची सुवर्णसंधी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी तब्बल साडेतीन तास चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत रमणार असून, या दुर्मिळ खगोलप्रदर्शनाचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत व प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वी सूर्याच्या तुलनेत लहान असल्याने तिची अवकाशात गडद मुख्य छाया व भोवती फिकट उपछाया तयार होते. चंद्र या गडद छायेतून गेला तर खंडग्रास किंवा खग्रास चंद्रग्रहण, तर फक्त उपछायेतून गेला तर छायाकल्प ग्रहण दिसते. चालू वर्षी सूर्य व चंद्र अशी चार ग्रहणे होत असली, तरी आपल्या भागातून फक्त हाच खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. यापूर्वीचे मार्चमधील ग्रहण किंवा येणारे सूर्यग्रहण भारतीय उपखंडातून दिसणार नाही, असे प्रभाकर दोड यांनी स्पष्ट केले.
7 सप्टेंबरला रात्री 9.57 वाजता (चंद्र सावलीत प्रवेश) ग्रहण प्रारंभ होणार आहे. मध्य ग्रहण रात्री 11.41 वाजता असेल. मध्यरात्री 1.26 ग्रहण मुक्त होईल. यावेळी चंद्र कुंभ राशीत तर सूर्य सिंह राशीत असेल. तसेच, चंद्राजवळ शनी ग्रह पूर्णवेळ झळकणार असून, खगोलप्रेमींना हा दुहेरी नजारा अधिकच संस्मरणीय ठरणार आहे. अवकाशप्रेमींसह सर्व सामान्यांसाठीही हा दुर्मिळ क्षण थक्क करणारा ठरणार आहे. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सावल्यांचा हा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी अवश्य आकाशाकडे नजर ठेवावी, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button