अतिवृष्टीचा तडाखा : 44,588 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान

शेतपिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
अमरावती / 28 ऑगस्ट : ऑगस्ट महिन्यात जिल्हाभर झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा तातडीने पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असे ठाम निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यामुळे शेतकर्‍यांना वेळीच मदत मिळेल आणि त्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जून, जुलैपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पिके उभी असतानाच फटका दिला. केवळ ऑगस्ट महिन्यात 44 हजार 588 हेक्टर शेतजमिनीवरची पिके बाधित झाली असून, त्यापैकी 272 हेक्टर जमीन खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. कापूस, तूर, सोयाबीन, धान, मका यांसारख्या मुख्य पिकांचे उत्पादन कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाचा तडाखा केवळ शेतापुरता मर्यादित राहिला नाही, तर मानवी वस्त्यांनाही मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे 53 कुटुंबांतील 216 नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. त्याचबरोबर 896 घरांची अंशतः पडझड झाली, तर 14 घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेवर या आपत्तीने मोठे संकट आणले आहे. तसेच आठ झोपड्या व गोठे पडले असून, घरगुती वस्तूंसह जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या आपत्तीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पशुधनाचाही मोठा बळी गेला असून 24 लहान व 19 मोठी जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकर्‍यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. मात्र, शेतकर्‍यांपर्यंत वेळेवर मदत पोहोचावी यासाठी पंचनामे अचूक आणि वेळेत करणे आवश्यक आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील प्रत्येक शेतकर्‍याचे नुकसान नोंदवले जावे. पंचनाम्यांच्या आधारे शासनाकडे तातडीने मदतीची मागणी करावी, जेणेकरून शेतकर्‍यांना आवश्यक ती मदत लवकर मिळेल.
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून, एकीकडे पिकांचे नुकसान तर दुसरीकडे जनावरांचा बळी यामुळे त्यांचा संसार कोलमडला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून होणारी आर्थिक मदत हीच शेतकर्‍यांची मोठी दिलासा ठरणार आहे. पंचनाम्यांवर आधारित ही मदत तातडीने मिळावी, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असा पुनरुच्चार पालकमंत्री बावनकुळे यांनी केला आहे.
-आपत्तीमध्ये तीन जणांचा मृत्यु
या आपत्तीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पशुधनाचाही मोठा बळी गेला असून 24 लहान व 19 मोठी जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पावसाचा तडाखा केवळ शेतापुरता मर्यादित राहिला नाही, तर मानवी वस्त्यांनाही मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे स्थलांतरण, घरांची अंशत: व पुर्णत: पडझड अशी संकटेही ओढावली. झोपड्या व गोठे पडले, घरगुती वस्तूंसह जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
-जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी
बाधित क्षेत्र : 44,588 हेक्टर
-खरडून गेलेली जमीन : 272 हेक्टर
-स्थलांतरित नागरिक : 216 (53 कुटुंबे)
-घरांची पडझड : 896 अंशतः, 14 संपूर्ण
-झोपड्या व गोठे पडझड : 8
-मृत्यू : 3, जखमी : 1
-जनावरे मृत्यूमुखी : 43 (24 लहान, 19 मोठी)

संबंधित बातम्या

Back to top button