अमरावतीकरांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
उड्डाणपुल बंद, पोलिसांचे आवाहन

-शहर वाहतुकीचा कणा तुटला
-आदेश न पाळणार्यांवर कारवाई
अमरावती / 26 ऑगस्ट : अमरावती शहराच्या राजकमल चौकातील रेल्वे स्टेशन, हमालपुरा आणि जयस्तंभ चौक या भागांना जोडणारा महत्त्वाचा रेल्वे उड्डाणपुल संरचनात्मक दृष्ट्या असुरक्षित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या संरचनात्मक लेखापरीक्षणानंतर उड्डाणपुल जुना झाल्याने तोडून नवीन आरबीओ (रेल्वे ब्रिज ओव्हरपास) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारी म्हणून वाहनचालकांसह पादचार्यांचाही प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. राजकमल चौक, हमालपूरा, जयस्तंभ चौक आणि रेल्वे स्टेशन चौक यांना जोडणार्या या महत्त्वाच्या पुलावरून वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने वाहनचालकांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्तित करुन दिले आहे.
पुलावर वाहतूक करण्याचा प्रयत्न करणार्या वाहनचालक व पादचार्यांविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे. हा पूल दररोज हजारो वाहनांचा भार वाहत होता. विशेषतः रेल्वे स्टेशन, बसस्थानक, तसेच बाजारपेठेकडे जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करताना काहीसा त्रास सहन करावा लागणार असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
-निश्चित करण्यात आलेले मार्ग
-हमालपूराकडून येणारी वाहने बसस्थानक – रेल्वे स्टेशन – मर्च्युरी टी पॉईंट या मार्गाने वळविण्यात आली आहेत. बसस्थानकातून निघणारी वाहने देखील याच मार्गाचा अवलंब करतील. राजकमल चौक व जयस्तंभ चौकाकडून येणारी वाहने राजापेठ पोलीस स्टेशन समोरून – राजकमल चौक – जयस्तंभ चौक – मालवीय चौक या पर्यायी मार्गाचा वापर करतील.




