आपत्तीत तातडीचा दिलासा, फक्त 15 दिवसांत पंचनामे अपलोड

शेतकर्‍यांना 23 कोटींची भरपाई मिळणार

-जिल्ह्यातील 17,669 बाधीतांना लाभ
-जिल्हा प्रशासनाची झटपट कार्यवाही
अमरावती / 25 ऑगस्ट : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जलदगतीने मदत पोहोचवण्यासाठी पावले उचलली आहेत. नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करून नैसर्गिक आपत्तीचे केवळ 15 दिवसांत पंचनामे अपलोड करण्यात आले आहे. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळण्यास मदत होणार आहे.
जून 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिक, फळपिकाच्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये शासनाने मान्यता दिली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ मदत देण्यासाठी बाधित शेतकर्‍यांच्या याद्या केवळ 15 दिवसांच्या कालावधीत, म्हणजे 22 ऑगस्ट 2025 पर्यंत ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने जिल्हास्तरावरुन या याद्यांना मान्यताही मिळाली आहे. तसेच एप्रिल आणि मे 2025 या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिक, फळपिकांच्या नुकसानीसाठी 22 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे. संबंधित तालुक्यांकडून एकूण 17,669 बाधित शेतकर्‍यांच्या 23 कोटी 27 लाख रूपयांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. या याद्यांनाही जिल्हास्तरावरुन मान्यता मिळाली आहे.
जून 2025 मधील अतिवृष्टीने सोयाबीन, कापूस व फळबागा शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत पाण्याखाली गेल्या. शेतकरी हातावर हात ठेवून मदतीची वाट पाहत होते; पण यावेळी प्रशासनाने विलंब न करता गती दाखवून दिली. केवळ 22 ऑगस्टपर्यंत याद्या ऑनलाईन अपलोड होऊन मंजूरीपर्यंत पोहोचल्या हा शेतकर्‍यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. गावोगावी ग्रामीण भागात शेतकरी या हालचालीकडे उत्सुकतेने पाहत आहेत. काही गावांत यावेळी तरी पैसे लवकर मिळणार असे बोलले जात आहे.
-निधी थेट बँक खात्यावर जमा होणार
आपत्ती आली की शेतकरी नेहमी सरकारकडे पाहतो. कधी कधी मदत मिळायला महिने उलटतात, तर कधी प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची असते की शेतकर्‍यांचा संयम संपतो. मात्र यंदा अमरावती जिल्हा प्रशासनाने वेगळीच धडपड दाखवत फक्त 15 दिवसांत पंचनामे अपलोड करून मंजुरी मिळवली. ही घाई-गडबड शेतकर्‍यांसाठी खर्‍या अर्थाने जीवनदायी ठरणारी आहे; कारण थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यावर पोहोचणार आहे.
-प्रक्रिया लवकर पूर्ण करणार : जिल्हाधिकारी
नैसर्गिक आपत्तीमधील मदत हा शेतकर्‍यांसाठी एक अत्यंत जिव्हाळा आणि महत्त्वाचा विषय आहे. जिल्हा प्रशासन पात्र शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने दक्ष असून कार्यरत आहे, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button