अचलपुर मतदारसंघाचे सात कोटी वरुड-मोर्शीकडे वळवले
चांदूरबाजारला मिळाले फक्त बेंच व सोलर दिवे

-लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेवर तीव्र चर्चा
-नागरिकांकडून संताप व्यक्त
चांदुर बाजार / 24 ऑगस्ट : अचलपुर मतदारसंघाला 2022 मध्ये नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या विकासाकरिता मंजूर झालेले तब्बल दहा कोटी रुपयांचे काम अचानक थांबवून त्यातील सात कोटी रुपयांचा निधी मोर्शी व वरुड नगरपरिषदेकडे वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी वळविण्यात आल्याने स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेबाबत तीव्र चर्चा रंगली आहे.
गेल्या कार्यकाळात तत्कालीन आमदार बच्चू कडु यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने मार्च 2022 मध्ये मंजूर केलेल्या या निधीतून अचलपुर व चांदूरबाजार नगर परिषदेत पाच-पाच कोटी रुपयांची कामे निश्चित करण्यात आली होती. अचलपुरमध्ये सापन नदीकाठच्या रस्त्यालगत विद्युतपुरवठा, मारोती संस्थानाजवळील सभागृह, जयस्तंभ चौक ते तहसिल कार्यालय रस्ता दुभाजक, विविध ठिकाणचे काँक्रीट रस्ते, अहिल्याबाई होळकर सभागृह अशा महत्त्वाच्या कामांना मान्यता होती. तर चांदूरबाजारात शिवमंदिर परिसराचा रस्ता, तारामाई मंदिरासमोरील सभागृह, टंडन गल्ली परिसरातील काँक्रीट रस्ता, शाळा व कार्यालयीन सोयी-सुविधा, उद्यान, बाजारपेठ, स्मारक सौंदर्यीकरण अशा नगर विकासाच्या कामांचा समावेश केला गेला होता.
मात्र, 11 जून 2025 रोजी शासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा आदेश देत निधीचे पुनर्वाटप करण्यात आले. त्यात मोर्शी नगर परिषदेला चार कोटी दहा लाख, वरुड नगर परिषदेला तीन कोटी दहा लाख देण्यात आले, तर उर्वरित फक्त दोन कोटी पन्नास लाख इतकी रक्कम चांदूरबाजार नगर परिषदेकडे सोपविण्यात आली. या निधीतून केवळ पाच प्रभागात लोखंडी बेंच व सोलर इंटिग्रेटेड डिव्हायसेस बसविण्याची कामे होणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच शहरात अनेक ठिकाणी बसवले गेलेले बेंचेस आज फारच तुरळक दिसतात, अशा परिस्थितीत पुन्हा बेंचेस लावण्यावर जनतेने आक्षेप घेतला आहे.
-जनक्षोभ व जनप्रतिनिधींची प्रतिक्रिया
यासंदर्भात जनतेच्या भावना प्रचंड तीव्र असून अचलपुरच्या विकासनिधीला गिळून चांदूरबाजारला फक्त बेंच मिळवून देणे हा आरोप लोकप्रतिनिधींवर होत आहे. सदर निधी वळविण्याशी माझा तिळमात्रही संबंध नाही. मी शासनाला अशा आशयाचे कोणतेही पत्र दिलेले नाही. माझ्या उदासिनतेबाबत केलेले आरोप निराधार आहेत. जर पुरावे असतील तर दाखवावेत, असे अचलपूरचे आमदार प्रविण तायडे यांनी म्हटले आहे. तर मला या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही, असे माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.




