अमरावती जिल्ह्यात अंतिम प्रभाग रचना जाहिर

स्थानिक स्व.सं. निवडणूक 2025

-जिल्हा परिषदेचे 59 विभाग निश्चित
-14 पंचायत समित्यांमध्ये 118 गण
-राज्य सरकारने दिली मान्यता
अमरावती / 22 ऑगस्ट : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा गाठत अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची अंतिम प्रभाग रचना शासनाने जाहीर केली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले आहे. विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम स्वरूपात तयार झालेल्या या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद अमरावतीमध्ये एकूण 59 निवडणूक विभाग निश्चित करण्यात आले आहेत. तर 14 पंचायत समित्यांअंतर्गत एकूण 118 निर्वाचक गण अस्तित्वात आले असून, यामध्ये प्रत्येक प्रभागाचा भौगोलिक व्याप, घरांची संख्या व मतदारांची संख्या याचा सविस्तर तपशील परिशिष्ट स्वरूपात देण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 12 ऑगस्ट 2025 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील सुधारित तरतुदीनुसार अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना सोपविण्यात आले होते. त्यानंतर 18 जून 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेप व सूचनांचा विचार करून सार्वजनिक सुनावण्या घेण्यात आल्या. त्या प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी आशिष गडेकर यांनी आदेश काढत अमरावती जिल्ह्याची अंतिम प्रभाग रचना निश्चित केली आहे. शासन आदेशानुसार ही संपूर्ण अधिसूचना, परिशिष्टे, अनुसूची व नकाशे आज 22 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, तहसील कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनाफलकावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या अंतिम रचनेची अधिसूचना राज्य राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असून, स्थानिक वृत्तपत्रांतून त्यास व्यापक प्रसिद्धी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित प्रत्येक कार्यालयाने सूचनाफलकावर प्रभाग रचना लावून तिच्या अप्रसिद्धीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे अधिसूचनेच्या दोन प्रती राज्य शासनास तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 12 अंतर्गत जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग व पंचायत समित्यांतील निर्वाचक गणांची संख्या व त्यांचा व्याप निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना आहे. त्या अधिकाराचा वापर करून अमरावती जिल्ह्यातील प्रभाग रचना आता अंतिम स्वरूपात निश्चित करण्यात आली आहे. या रचनेत प्रत्येक पंचायत समितीच्या भौगोलिक मर्यादेनुसार गणांची विभागणी करण्यात आली असून, त्या-त्या भागातील घरसंख्या व मतदारसंख्या लक्षात घेऊन विभागणी केली गेली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अमरावतीतील 59 विभाग हेच जिल्हास्तरीय निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरणार असून, 14 पंचायत समित्यांतील 118 निर्वाचक गण ग्रामीण भागातील नेतृत्वाला आकार देणार आहेत. प्रत्येक समितीतील स्थानिक दिग्गज, विद्यमान सदस्य, नव्या उमेदवारांच्या आकांक्षा व पक्षीय रणनीती यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या या अंतिम प्रभाग रचनेनंतर आता संपूर्ण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रंगमंच सज्ज झाले आहे. प्रभागांचे आरक्षण, उमेदवारांची निवड, राजकीय आघाड्यांची समीकरणे आणि मतदारांचे मनोविज्ञान या सार्‍यांवर आगामी दिवसांत चर्चेचे वादळ उठणार असून, अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाला नवे वळण देणार्‍या या निवडणुकीच्या प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करीत आहेत.
-रणधुमाळीची वाट मोकळी
निवडणूक प्रक्रियेत हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे आता पुढे प्रभागनिहाय मतदारसंख्या निश्चित करणे, त्यानंतर आरक्षणाची सोडत काढणे, उमेदवारी अर्ज, प्रचाराची रणधुमाळी या सर्व टप्प्यांची वाट मोकळी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांचे लक्ष लागले आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या ग्रामीण भागातील विकासाचे केंद्रबिंदू मानल्या जातात. परिणामी या रचनेमुळे आता राजकीय समीकरणे व गणिते बदलण्यास सुरुवात होणार आहे.
-18 आक्षेपांपैकी 16 अमान्य
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात दाखल झालेल्या एकूण 18 आक्षेपांपैकी तब्बल 16 आक्षेप अमान्य करण्यात आले असून केवळ दोन आक्षेप मान्य ठरले आहेत. चिखलदरा आणि अचलपूर तालुक्यातील प्रत्येकी एक असे दोन आक्षेप मान्य झाले. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत काटकुंभ गणातील आमझरी ग्रामपंचायत पूर्वीप्रमाणे सलोनात समाविष्ट करण्यात आली. तसेच अचलपूर पंचायत समितीमधील धामणगाव गढी गणामधील हणवतखेडा हे गाव धोतरखेडामध्ये समाविष्ठ करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button