वर्षानुवर्षांचा अंधकार नष्ट! धोतरखेडा प्रकाशात उजळले
महावितरणचे प्रयत्न, आदिवासींचे जीवन प्रकाशमान

अचलपूर / 22 ऑगस्ट : बैल पोळ्याच्या पहाटेसह धोतरखेडा आदीवासी वस्तीच्या जीवनात प्रकाशाची नवी किरणं पसरली आहेत. वर्षानुवर्षे अंधारात जीवन जगत असलेल्या या वस्तीसाठी महावितरणने 10 पोल उभारून नवीन वीज वाहिनी जोडली, ज्यामुळे वस्तीतील घराघरांमध्ये उजेड पसरला. विजेचा प्रकाश पाहताच ग्रामस्थांच्या चेहर्यावर आनंद झळकला आणि त्यांनी मनापासून महावितरणचे आभार मानले.
परतवाडा लगत चिखलदरा मार्गावरील नदीच्या काठावर वसलेले धोतरखेडा गाव अनेक वर्षे वीजेशिवाय अंधारात बुडाले होते. रात्री कुटीवजा घरे अंधाराने वेढलेली असायची. यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असे, वृद्धांना रात्री हालअपेष्टा सोसाव्या लागत होत्या, तर महिलांना घरकामात त्रास होत होता. ही समस्या महावितरण अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकार्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. अंधारे यांनी सांगितले, नदीकाठी असलेल्या या वस्तीत प्रकाश व्यवस्था अत्यावश्यक आहे. यामुळे सुरक्षा वाढेल आणि मुलांच्या शिक्षणालाही नवी दिशा मिळेल.
स्थानिक अधिकारी व कर्मचार्यांनी आदिवासी बांधवांना कागदपत्रांची जुळवाजुळव, ऑनलाईन फॉर्म भरणे आणि इतर प्रक्रियेत मदत केली. यानंतर वीज पुरवठ्यासाठी अंदाजपत्रक व तांत्रिक योजना आखण्यात आल्या. महावितरणने 10 पोल उभारून 11 पैकी 5 घरांना विज जोडणी दिली. घरकुलांमध्ये विज मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी विजमीटरची पूजाअर्चा करून महावितरणच्या कर्मचार्यांचे आभार मानले. उर्वरित घरांना लवकरच विज जोडणी मिळणार आहे.
-गावातील आनंदाचा क्षण
या कामात उपकार्यकारी अभियंता संजय दातीर, सहाय्यक अभियंता प्रतीक टेकाडे, तसेच महावितरणचे इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन प्रकल्प पूर्ण केला. घराघरांत दिवे लागल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला. त्यांचा विश्वास आहे की, मुलांचे शिक्षण आता सुरळीत होईल, महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल, आणि अंधाराचे संकट दूर झाले आहे. धोतरखेडा वस्ती आता प्रकाशाने उजळली असून, विकासाच्या नव्या वाटेकडे वाटचाल सुरू झाली आहे.




