भर पावसात हजारो फेरीवाल्यांचे धरणे आंदोलन
मनपाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात हॉकर्स आक्रमक

*रोजीरोटीवर कुर्हाड असल्याचा आरोप
अमरावती /13 ऑगस्ट : शहरातील रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे. यात रस्त्याकडेला हातगाड्या, खोके लावून व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांनाही हटविण्यात येत आहे. या कारवाईविरोधात हॉकर्स युनियन आक्रमक झाले असून, त्यांनी आज दुपारी मनपा मुख्यालयाचा घेराव करून मुख्य प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. विशेष म्हणजे दिवसभर कोसळणार्या पावसातही शेकडो फेरीवाले भिजतच ठाण मांडून बसले होते. शहरातील विविध भागांतून आलेल्या सुमारे एक हजार हॉकर्सनी या आंदोलनात सहभाग घेतला. हॉकर्स युनियनचे अध्यक्ष गणेश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात फेरीवाल्यांनी आरोप केला की, ते प्रामाणिक मेहनत करून रस्त्याकडेला लहान-मोठा व्यवसाय करतात, दोन वेळच्या जेवणाची सोय करून कुटुंबाचा सांभाळ करतात. मात्र, मनपा प्रशासन अतिक्रमणविरोधी कारवाईच्या नावाखाली त्यांच्या रोजीरोटीवर कुर्हाड चालवत आहे. अनेकदा त्यांचे संपूर्ण साहित्य जप्त केले जाते. युनियनचे म्हणणे आहे की, पक्क्या दुकानदारांनी दुकानासमोर केलेले अतिक्रमण दुर्लक्षित करून, वाहतुकीत अडथळा न आणणार्या फेरीवाल्यांना लक्ष्य केले जात आहे. ही कारवाई एकतर्फी, भेदभावपूर्ण व अन्यायकारक असल्याचा आरोपही करण्यात आला. हॉकर्स युनियनने यापूर्वीही विविध मार्गांनी आंदोलन करून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर मनपा मुख्यालयासमोर धरणा आंदोलन करून आपला संताप व्यक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे युनियनने स्पष्ट केले.




