हिंदुत्वाशी दगाबाजीच 2019 मध्ये युती सरकार न बनण्यामागे कारण
नितेश राणेंची अप्रत्यक्ष टीका

-उद्धव ठाकरेंवर निशाना
मोर्शी / 3 ऑगस्ट : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तापताना दिसत आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी रविवारी मोर्शी येथे आयोजित एका कार्यक्रमात, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला जनतेने स्पष्ट कौल दिला होता, मात्र नंतर काही लोकांनी हिंदुत्वाशी दगाबाजी केल्याने आमचं सरकार सत्तेत येऊ शकलं नाही, असा स्पष्ट आरोप राणेंनी केला. जनतेचा कौल युतीला होता. पण काही ’चपट्या पायाचे’ लोक राजकारणात आले आणि त्यांनी हिंदुत्वाच्या रेषा पार केल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. ही दगाबाजी होती, असं राणे म्हणाले.
मोर्शी येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, आणि खासदार नवनीत राणा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना डॉ. बोंडे यांनी राहू-केतूचा उल्लेख केला होता. त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले, राजकारणात काही लोक ’राहू-केतूसारखे’ नाहीत, ते ’चपट्या पायांचे’ आहेत. त्यांच्या पायामुळेच आमच्या युतीचे सरकार येऊ शकलं नाही.
राणे यांनी यावेळी मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या उभारणीसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. हे महाविद्यालय फक्त भूमिपूजनापुरतेच मर्यादित राहणार नाही, तर पुढील दोन वर्षांत त्याचं उद्घाटनही भाजप सरकारच करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी उपस्थित खासदार डॉ. बोंडे यांना विनोदाच्या सुरात सांगितले,
राणे यांनी राज्यातील मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी सरकारने उचललेली पावलं यावरही भर दिला. सध्या महाराष्ट्र देशात 16 व्या क्रमांकावर असून, 2029 पर्यंत महाराष्ट्राला पहिल्या पाच राज्यांमध्ये पोहोचवण्याचा सरकारचा निर्धार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी असंही सांगितलं की, मत्स्य व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून, तो हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. सरकार मच्छीमारांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी कटीबद्ध आहे. नितेश राणेंनी थेट नाव न घेता केलेली टीका ही ठाकरे गटाच्या राजकीय भूमिकेवर प्रखर टिप्पणी मानली जात आहे. 2019 मध्ये भाजपसोबत सत्तास्थापन न करता शिवसेनेने एनसीपी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं, आणि यावरूनच हिंदुत्वाशी बेईमानी झाल्याचा आरोप पुन्हा उफाळून आला आहे.




