नागपंचमीच्या दिवशीच सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू

पांढरीत दुर्दैवी घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

चांदूरबाजार/ 31 जुलै : चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी गावात नागपंचमीच्या पावन दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावातील रहिवासी आणि शेतकरी देवकुमार बाबाराव गायकवाड (वय 45) यांचा झोपेत असताना सर्पदंशामुळे मृत्यू झाला. 28 जुलैच्या मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास ही घटना घडली.
देवकुमार गायकवाड हे आपल्या कुटुंबासोबत घरी झोपलेले असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्याचे भान येताच त्यांनी कुटुंबीयांना जागं केलं. तत्काळ कुटुंबीय आणि शेजार्‍यांनी मदतीला धाव घेत, त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर दोन दिवस डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र 30 जुलै रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देवकुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यामागे वृद्ध आई, पत्नी व तीन लहान मुले असा परिवार असून, कुटुंबाचे एकमेव आधारस्तंभ हरपल्याने गायकवाड कुटुंब दुःखात बुडाले आहे. देवकुमार हे मेहनती शेतकरी व शेतमजूर होते. पांढरी गावात त्यांच्या कार्यतत्परतेसाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून, नागपंचमीच्या दिवशीच सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने या घटनेने गावकर्‍यांना भावनिक धक्का बसला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून गायकवाड कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केली असून, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागात सर्पदंशविषयक जनजागृती आणि वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button