क्लेशदायक…! 12 तास बेवारस पडून होता सुमतीचा मृतदेह

कुटुंबियांचा आरोप, प्रशासन, शाळा व्यवस्थापनाची बेफिकरी

-नागापूर आश्रमशाळेतील दुर्घटना, चौकशी सुरू
-मुख्याध्यापक आणि अधीक्षक निलंबित
अमरावती / 30 जुलै : मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत मंगळवारी दुपारी घडलेली दुर्घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारी ठरली. या शाळेतील 14 वर्षीय विद्यार्थीनी सुमती सोमा जामुनकर (रा. बामदेही) हिचा जीर्ण अवस्थेतील पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून मृत्यू झाला. पण, सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे तिचा मृतदेह तब्बल 12 तास रुग्णालयात बेवाऱस अवस्थेत पडून होता आणि कुटुंबियांना याची कसलीही माहिती देण्यात आली नाही.
सुमतीचा मृत्यू दुर्दैवी असला तरी नंतरचा प्रसंग आणखी भयावह होता. शाळा प्रशासन, शिक्षक, अधीक्षक, कोणीही घटनास्थळी मदतीला धावून आले नाही. इतकंच नव्हे, तर रुग्णालयात दाखल करताना देखील तिची ओळख न पटवता, बेवारसपणे सोडून दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचा चेहराही आम्हाला दाखवला नाही. असं सांगत मृत सुमतीच्या आईचा आक्रोश संपूर्ण रुग्णालयाच्या भिंतींना हादरवून गेला.
प्राथमिक माहितीनुसार, शाळा परिसरातील पाण्याच्या जीर्ण टाकीची भिंत अचानक कोसळली, आणि सुमती त्या ढिगार्‍याखाली दबल्याने तिचा मृत्यू झाला. तर अन्य तीन विद्यार्थीनी या घटनेत गंभीररीत्या जखमी झाल्या. हा अपघात अचानक झाला असला तरी, शाळा व्यवस्थापनाची उदासीनता, घटनेनंतरची माहिती लपवण्याची चूक आणि प्रशासनाची उदासीन प्रतिक्रिया यामुळे संपूर्ण प्रकरण गंभीर बनले आहे. केवळ नावापुरते निरीक्षण आणि निष्क्रिय व्यवस्थापन हेच या घटनेमागचे खरे कारण असल्याची भावना आता सर्वत्र व्यक्त होत आहे. दुर्घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी, ही घटना अत्यंत दु:खद असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
ही घटना केवळ एका बालिकेच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही. ही घटना संपूर्ण आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षण, सुरक्षेच्या आशा-अपेक्षांवर गालबोट लावणारी आहे. वर्षानुवर्षे लाखो रुपयांची अनुदाने घेतली जातात, निरीक्षण अहवाल लिहिले जातात, परंतु एकही बालक सुरक्षित नाही, हे या घटनेने ठसवून दिले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर व्यक्त होत आहे. सुमतीसारखी निष्पाप बालिका आपल्या स्वप्नांसह कायमची निघून गेली… तिच्या मृत्यूला दोषी कोण? शाळा व्यवस्थापन? प्रशासन? की संपूर्ण व्यवस्था? या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी अजून किती सुमतींचा बळी द्यावा लागणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
-जखमी तीन विद्यार्थीनींवर उपचार
सदर घटनेत राधीका जामुनकर, अनिशा सेलूकर आणि राणी धांडे या तीन विद्यार्थीनी जखमी झाल्या असून, त्यांना परतवाडा येथील रावत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील एका विद्यार्थिनीची स्थिती गंभीर असून शस्त्रक्रिया करण्याची तयारी सुरू आहे. ही आश्रमशाळा मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या संस्थेमार्फत चालवली जाते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाळेचा कारभार, व्यवस्थापनाची कार्यपध्दती, तसेच अनुदानाच्या वापराबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.
-शाळांची पाहणी करण्याच्या सुचना
घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिष येरेवार यांनी संपूर्ण जिल्ह्यातील आश्रमशाळांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जी इमारत जीर्ण व धोकादायक स्थितीत आहे, तिथे तातडीने उपाययोजना करण्यात येतील. मृतक कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे माजी आमदार राजकुमार पटेल, सभापती रोहित पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button