कुत्र्यांच्या हल्लयात म्हैस आणि नवजात बछडा ठार

अचलपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा कहर!

-नागरिकांमध्ये संताप, नगरपरिषदेवर रोष
अचलपूर / 28 जुलै : अचलपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करीत असून, या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज सोमवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन लाख रुपये किमतीची म्हैस आणि तिचं नवजात बछडं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील देवडी परिसरात श्री टॉकिजनजीक राहणार्‍या अभिमन्यू खोलापूरे यांच्या गोठ्यात ही धक्कादायक घटना घडली. आज सकाळी गोठ्यातील म्हैस आणि तिचं नवजात वासरू हे कुत्र्यांच्या झुंडीच्या हल्ल्याचा बळी ठरले. कुत्र्यांनी बछड्याचे शरीर अक्षरशः फाडून टाकलेले दिसले, तर म्हैसही गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाली. या हृदयद्रावक दृश्यांनी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुत्र्यांची प्रचंड दहशत रहिवाशांमध्ये दिसून येत आहे.
नागरिकांचा ठाम आरोप आहे की नगर परिषद वारंवार तक्रारी करूनही भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. कुत्र्यांची संख्या शहरात बिनधास्त वाढत असून, त्यांच्या झुंडी आता वसाहतींत, बाजारपेठांमध्ये आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम फिरताना दिसतात. प्रशासनाकडून ना पकड मोहीम राबवली जाते, ना नसबंदीची कोणतीही ठोस पावले उचलली जात आहेत.
महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे दररोजच्या भितीमध्ये जीवन जगत आहेत. काही भागांत तर नागरिक संध्याकाळनंतर घराबाहेर पडण्यासही घाबरू लागले आहेत. शाळकरी मुलांवर, सायकलवर जाणार्‍यांवर आणि हातगाड्या ओढणार्‍या कामगारांवरही हे कुत्रे हल्ले करत आहेत. भटक्या कुत्र्यांवर तातडीने कारवाई करून पकड मोहीम राबवावी, नसबंदी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, मृत जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, शहरात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button