अमरावती जिल्ह्यात केवळ 48.1 टक्के पावसाची नोंद

सरासरीच्या तुलनेत मोठी तफावत

-चिखलदरा व तिवसा आघाडीवर
-धारणी तालुक्यात सर्वात कमी पाउस
अमरावती / 28 जुलै : अमरावती जिल्ह्यात 28 जुलै 2025 रोजी सकाळी 10.51 वाजेपर्यंत नोंदविण्यात आलेल्या तहसीलनिहाय पावसाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचा एकंदर पावसाचा टक्का चिंताजनक असून, जून ते जुलै अखेरपर्यंत केवळ 48.1 टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही तहसीलमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला तरी अनेक भाग अजूनही कमी पावसाखाली आहेत.
जून महिन्यात जिल्ह्याचा सामान्य पर्जन्यमान 145.7 मिमी होते, परंतु प्रत्यक्षात सरासरीपेक्षा 72.7 टक्के म्हणजेच 105.9 मिमीच पाऊस झाला. धारणी (45.4 टक्के), नांदगाव खंडेश्वर (52.6 टक्के) आणि चांदुर रेल्वे (68.8 टक्के) या तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली. दुसरीकडे, वरुड (142 मिमी – 106.8 टक्के) आणि दर्यापूर (103.9 मिमी – 96.2 टक्के) या तालुक्यांत सरासरीच्या जवळपास पाऊस झाला.
जुलै महिन्यात जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 216.4 मिमी असून प्रत्यक्षात केवळ 199.9 मिमी (92.3 टक्के) पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण तिवसा (156.1 टक्के), चिखलदरा (128.1 टक्के) आणि चांदुर रेल्वे (122.7 टक्के) या भागांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक होते. अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि नांदगाव खंडेश्वर या भागांत मात्र पावसाचे प्रमाण 70 टक्के पेक्षा कमी आहे. जून ते आतापर्यंतचा एकूण पाऊस 360.5 मिमी असून तो सरासरीच्या 90.9 टक्के आहे. यामध्ये चिखलदरा (477.4 मिमी), तिवसा (389.7 मिमी) आणि वरुड (382.4 मिमी) आघाडीवर आहेत. धारणी (292.5 मिमी – 59.4%) आणि अचलपूर (272.2 मिमी – 71.3%) या भागांत अपेक्षेपेक्षा कमी पावसाची नोंद आहे.
हंगामाच्या 4 महिन्यांच्या सरासरीच्या (749.8 मिमी) तुलनेत आतापर्यंत 445.3 मिमी म्हणजेच केवळ 48.1 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तिवसा (66.6%), वरुड (62.9%) आणि चिखलदरा (62.7%) हे तहसील सर्वात पुढे असून धारणी (27.4 टक्के), अचलपूर (31.5 टक्के) आणि भातकुली (31.9 टक्के) हे तहसील खालच्या स्थानावर आहेत.
-मागील वर्षाच्या तुलनेत घट
मागील वर्षी याच कालावधीत सरासरी 395.9 मिमी पावसाची नोंद झाली होती, परंतु यंदा केवळ 318.3 मिमी झाल्याने घट स्पष्ट आहे. नांदगाव (134.1 टक्के), वरुड (131.6 टक्के) आणि तिवसा (130.5 टक्के) या भागांत मागील वर्षीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली असली, तरी बहुतांश तालुक्यांत घट आहे. अमरावती जिल्ह्यात एकूणच समाधानकारक पावसाची परिस्थिती नसून, बहुतांश तहसील सरासरीच्या 50 टक्क्यांच्या खालीच आहेत. शेतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या ऑगस्ट महिन्यात पावसात वाढ होणे अत्यावश्यक आहे, अन्यथा खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button