सतर्क रहा! राज्यात पुढील 5 दिवस धो-धो पावसाचे
4 जिल्ह्यात रेड अलर्ट, विदर्भालाही इशारा

मुंबई / 25 जुलै : हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय. पुढील 5 दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. हवामान विभागाने आज पालघर, रायगड, भंडारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलाय. तर कोकण आणि विदर्भातील वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील इतर जिल्हे, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली 24 आणि 25 रोजी ओडिशा 25 आणि 26 रोजी छत्तीसगड, 26 आणि 27 रोजी मध्य प्रदेश, 25 जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, विदर्भ आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईसाठी पुढील 3 ते 4 तास हे महत्वाचे असून मुंबईसह इतर परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
27 जुलै रोजीही विदर्भात ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. उथळ ठिकाणी पाणी साचत असल्यानं त्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होतेय. भारतीय हवामान विभागने अंदाज वर्तवला आहे की, 26 जुलै रोजी मुंबईतील हवामान सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मुसळधार पावसाचे वातावरण राहील.
उद्या शनिवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण कोकण, धाराशिव आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चंद्रपूर, गोंदिया, पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील 16 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. ज्या भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. हवामान खात्याकडून अनेक शहरांना बर्याच वेळा यलो अलर्ट दिला जातो. याचा अर्थ म्हणजे शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता असते. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो.




