गाडगेबाबा आणि भाउसाहेबांच्या परंपरेनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

-नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे समर्थन
-नॉन गव्हर्नमेंट कॉलेज असोसिएशनचे अधिवेशन
अमरावती / 25 जुलै : शिक्षणाची ज्या प्रकारची परंपरा संत गाडगेबाबा आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भाला दिली आहे त्याच परंपरेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्यामुळेच पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावर अधिक भर दिला आहे. या देशातले शिक्षण हे जगाचे शिक्षण ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न असून बेरोजगारांच्या फौजा निर्माण करणारे शिक्षण बदलायचे आहे, या शब्दात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे समर्थन केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोशिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसचे 40 वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या अधिवेशनाच्या उदघाटन कार्यक्रमाला राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद तसेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, आमदार किरण सरनाईक, महाराष्ट्राचे उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, अमरावती विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सुकाणू समितीचे सदस्य सी. ए. अनिल राव, अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख, उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम आणि सचिव डॉ. सुधाकर जाधवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, अॅड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, संस्थेचे सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य व आयोजन समितीचे निमंत्रक डॉ. अंबादास कुलट, स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील, डॉ. पुरुषोत्तम वायाळ, प्राचार्य अमोल महल्ले, आयोजन समितीचे सचिव प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांचीही यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद तसेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी आपल्या भाषणातून नवीन शैक्षणिक धोरणावर भाष्य केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांची शिक्षण, शेती आणि आरोग्य याबाबत जी कल्पना होती तिचाच जवळपास नवीन शैक्षणिक धोरणात समावेश असून त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे, असे ते म्हणाले. अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोशिएशनचे उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम यांनी आपल्या भाषणातून शिक्षण क्षेत्राचे आणि प्राचार्यांचे प्रश्न सविस्तर मांडले. तर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठांच्या प्रश्नाबाबत व कार्याबाबत भाष्य केले.
राज्यातील प्राचार्य येथे यावेत व त्यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि भाउसाहेबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावा, हा या अधिवेशनाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. अधिवेशानानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन, डॉ. मोनिका उमक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि अमरावती इंडस्ट्रीयल असोशिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी तयार केलेल्या ‘इंडस्ट्री हायर एज्युकेशन लिंकेज प्रोग्राम’या पोर्टलचे उदघाटन या कार्यक्रमात करण्यात आले. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. वि. गो. ठाकरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा परिचय करून दिला. संचालन प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांनी केले तर प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी आभार मानले. सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूरच्या संगीत विभागाच्या चमूने डॉ. राजेश उमाळे यांच्या नेतृत्त्वात गौरव गीत सादर केले. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील आजी-माजी प्राचार्य मोठ्या संख्येने आले आहेत. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य, अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-भारतीय ज्ञान परंपरेच्या माहितीवर भर
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात संशोधनाला अधिक महत्त्व देण्यात आले मातृभाषेतून शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण आणि भारतीय ज्ञान परंपरेची माहिती हे या धोरणाचे वैशिष्ट आहे. या धोरणात प्राचार्य आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी या धोरणाचा गाभा समजून घेणे व त्यासाठी माणूस समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या भागातील उद्योग व व्यवसायाला आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार करण्यासाठी तशाप्रकारचे अभ्यासक्रम तयार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.




