1.40 कोटींचं बिल थकलं, तरुण कंत्राटदाराची आत्महत्या

सांगली / 23 जुलै : लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला आहे. अनेक खात्यांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालविकास खात्यात वितरीत करण्यात आल्याने मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता सरकारनं बिल वेळेत न दिल्याने एका तरुण कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलले आहे. जल जीवन विकास कामाचे बिल वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हर्षल पाटील (वय 35) हे वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावचा रहिवासी आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना सध्या ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागात घराघरापर्यंत पाणी पोहचवण्यात यावे, हा सरकारचा हेतू आहे. त्याचेच एक कंत्राट हर्षल पाटील यांना मिळाले होते. परंतु, बिल मिळत नसल्यामुळे हर्षल पाटील यांनी शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले की, हर्षल पाटील यांचे 1.40 कोटी रुपयांचे देयक प्रलंबित आहे. तसेच, पाटील यांनी सावकार आणि अन्य लोकांकडून 65 लाखांचे कर्ज घेतले होते. ‘शासन आपले पैसे देत नाही. इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत. मी आत्महत्या करतो. वडिलांना काही सांगू नका,’ असे हर्षल हे आपल्या मित्रांना सांगत होते. शासनाने तातडीने हर्षल पाटील यांच्या कुटुंबास आर्थिक मदत आणि प्रलंबित असलेली देयके द्यावीत. त्यासह सर्व विभागातील देयके शासनाने द्यावीत. अन्यथा नवयुवक, उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील. याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.




