हनी ट्रॅप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

-सरकारवर साधला निशाणा
मुंबई / 21 जुलै : राज्यातील काही मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असे काहीच घडले नसल्याचे निवेदन केले. सवयीप्रमाणे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलले. या हनी ट्रॅपचे धागेदोरे भाजपाच्या अत्यंत जवळ पोहोचले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटच्या मंत्र्याबरोबर हनी ट्रॅपशी संबंधित व्यक्तीचा फोटो झळकल्याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच गडद झाले असून सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (ता. 21 जुलै) केला. याशिवाय हनी ट्रॅपची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
हनी ट्रॅप प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले होते. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी हे प्रकरण विधानसभेत लावून धरले होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची फारशी दखल घेतली नाही. या पार्श्वभूमीवर हनी ट्रॅपचा फास सत्ताधार्‍यांच्या गळ्यात असून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली, असे सपकाळांकडून सांगण्यात आले. तर, राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचे कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाइन रमी खेळत आहे, हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार आणि पदाधिकारी गुंड, मवाली बनले आहेत. परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसण घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची मर्दुमकी दाखवणार्‍यांनी निर्लज्ज कृषी मंत्री आणि गुंडगिरी करणार्‍या पदाधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी आव्हानच सपकाळांनी सत्ताधार्‍यांना दिले आहे.
विधानभवनात झालेल्या हाणामारीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, आमदार माजले आहेत. पण आमदारच नाही तर मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारीही माजले आहेत, हे त्यांना दिसत नाही का? कृषिमंत्री कधी शेतकर्‍यांना भिकारी म्हणतात तर कधी कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी मुलांची लग्न लावतात म्हणून अपमान करतात. आता कृषिमंत्री चक्क विधानसभेत रमी खेळत बसले होते. या घटनेचा निषेध करताना छावा संघटनेने लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत खेळण्याच्या पत्त्यांचा सेट दिला. हा निषेध करण्याचा मार्ग आहे, त्यात चुकीचे काय? पण अजित पवारांच्या गुंडांनी त्या आंदोलकांना बेदम मारहाण केली. हा माज कशातून येतो? सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे. पण सत्तेची ही नशा जास्त काळ रहात नाही. त्यामुळे कृषी मंत्र्याला घरी पाठवा आणि या माजलेल्या गुंडांना तुरुंगात खडी फोडण्यासाठी पाठवा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button