गुरुकुंजातील इमारती गुरुदेव सेवा मंडळाकडे हस्तांतरित होणार
विकास आराखड्यातील बांधकामे

-आ. राजेश वानखडे यांची लक्षवेधी
-विधानसभेत उपस्थित केला मुद्दा
तिवसा / 17 जुलै : तिवसा मतदार संघातील गुरुकुंज मोझरी व कौडण्यपूर विकास आराखड्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारती ओस पडून त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विकास आराखड्यात निधीची तरतूद करून गुरुकुंज मोझरी विकास आराखड्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारती देखरेखीसाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाला हस्तांतरित करण्यात याव्या, अशी मागणी तिवसाचे आमदार राजेश वानखडे यांनी केली आहे.
यासंदर्भात आ. राजेश वानखडे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधिमंडळात लक्षवेधी मांडली. गुरुकुंज मोझरी येथील दास टेकडी लगत 16 एकर जागेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी विकास आराखडा अंतर्गत शेगावच्या धरतीवर अध्यात्मिक संकुल, ग्रामविकास प्रबोधिनी, भक्तनिवास, विशेष अतिथिगृह अशा इमारती गुरुदेव भक्तांच्या सोयीसाठी काही कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आल्या आहेत. परंतु, त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या इमारतींची दुरवस्था झाली आहे.
आज या सर्व इमारती धुळ खात पडून आहेत. परिणामी बांधकामावर झालेला कोट्यवधी रुपयांची खर्च निरर्थक ठरत आहे. गुरुकुंजात येणार्या गुरुदेव भक्तांनाही त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे या इमारती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाकडे हस्तांतरित करण्यात येणे आवश्यक असल्याचे राजेश वानखडे यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. अशी मागणी गुरुदेव सेवा मंडळासह गुरुदेव भक्तांकडूनही करण्यात आली होती, असे वानखडे यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत आ. राजेश वानखडे यांनी गुरुदेव भक्तांची गैरसोय टाळण्याकरिता अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले.
तिवसा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी, संत गाडगेबाबा यांची वलगाव ही निर्वाणभूमी तसेच माता रुक्मिणीचे माहेर असलेले तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर याठिकाणी विकास आराखड्यातून विविध विकासकामे लवकरच होणार आहेत. यावर नियोजन मंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. सदर इमारतींच्या दुरुस्तीचा व हस्तांतरणाचा प्रश्न तातडीने निकालात निघणार असल्याचे आमदार राजेश वानखडे यांनी सांगितले आहे.




